जग झपाट्याने बदलतंय मंडळी... आधी राजा महाराजांना हवा घालण्यासाठी नोकरचाकर असायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि पंखे कुलरचा जमाना आला. आता तर बघेल तिकडे एअरकंडिशनर दिसतो राव!! घर, ऑफिसमध्ये भर उन्हाळ्यातसुद्धा गार हवेचा अनुभव लोकांना करता यायला लागला. एसी वापरणारे आणि न वापरणारे यावरून लोक भेदभावसुद्धा करतात. एखादा एसीत बसणारा गरीबांबद्दल बोलायला लागला की 'तुला काय जातं एसीत बसून बोलायला' हा डायलॉग सर्रास ऐकायला मिळतो. पण या सगळ्या गोष्टी काही दिवसातच इतिहासजमा होतील असं दिसतंय.
तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही तुमच्या ऑफिस आणि कारच्या बाहेर पडलात म्हणजे तुम्हाला ऊन हे सहन करावे लागणारच अशी एकंदरीत सध्या परिस्थिती आहे. पण आता सगळी समीकरणे एकेक करून बदलत आहेत राव!! याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोनी कंपनीने बाजारात आणलेला नवीन एसी!! हा एसी सगळ्यांना वापरता येईल एवढा स्वस्त आहे राव!! त्यापेक्षा मोठी त्याची खासियत म्हणजे हा एसी तुमच्या बनियनमध्ये लावलेला असेल, याचाच अर्थ असा की भर उन्हात फिरतानासुद्धा तुम्हाला ठंडा ठंडा कूल कूलचा अनुभव घेता येईल. मंडळी, या भन्नाट एसीची किंमत आहे फक्त ९ हजार रुपये!!







