दिवाळी आहे देशभर. सगळं काही भक्तीमय. सुजलाम सुफलाम वातावरण. त्यात विशेष करून व्यापारी वर्ग, जो लक्ष्मीपूजनाच्या पावनपर्वावर आई महालक्ष्मी आणि लाल रंगाच्या कपड्यात विणलेल्या, पिस्ता रंगाच्या कागदात जमलेल्या, खाता वहीच्या पूजनात मग्न असणार. पण आजही ही व्यापार व्यवहाररुपी लक्ष्मी अर्ध्या मराठी युवांच्या नशिबी नाही. कारण की व्यावहारिक प्रगल्भता आजसुद्धा मराठी तरुणात क्वचित सापडते. त्यावरून बदलता काळ आणि स्टार्टअपचे बदलते रूप.
सर्वप्रथम हे समजून घ्या की स्टार्टअप काय असतं? स्टार्टअप म्हणजे जी गोष्ट तुम्ही शोधली आहे अथवा समाजातील एका समस्येचे समाधान तुम्ही शोधून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही त्यास एक नियोजित व्यापारिक रूप देता, त्यास स्टार्टअप असे म्हणतात. एखाद्या ब्रँडची फ़्रेन्चाइज घेणे अथवा कुठेतरी चहाटपरी की वडापाव गाडी थाटणे म्हणजे स्टार्टअप नाही. स्टार्टअपची सुरुवात करण्याआगोदर समाजातील उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा, वस्तूंचा अभ्यास करावा लागतो. कोणत्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत, कोणत्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत आणि ज्या आहेत त्यांचा दर्जा काय आहे, मोल काय आहे, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का? की नवीन संशोधित गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच स्टार्टअपची संकल्पना उभी होते.
कृषी क्षेत्रात अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जे काही नवीन गोष्टींचे संशोधन केले आहे त्यात ते व्यवहारिक संकल्पना निर्माण करून सामान्य ग्राहकापुढे सोप्या पद्धतीने मांडून तुम्ही त्या गोष्टींचे स्टार्टअप निर्माण करता, यावर तुम्ही ५ ते ६ वर्ष केलेल्या अभ्यासाचा निकाल ठरतो. स्टार्टअप क्षेत्रात एक भौतिक संकल्पना आहे "तेच निर्माण करा जे विकू शकता, ते नको जे तुम्ही विकू शकत नाही", म्हणजेच तुम्ही काहीही निर्माण केले अथवा कोणत्याही क्षेत्रातील स्टार्टअपची निर्मिती केली तर ज्या वस्तू किंवा सेवेची निर्मिती आपण करत आहात त्याची विक्रीसुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे.