ह्यू हेफनर - सेक्स म्हणजे पाप नाही या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या एका अवलियाचा अंत...

ह्यू हेफनर - सेक्स म्हणजे पाप नाही या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या एका अवलियाचा अंत...

ह्यू हेफनर यांचे निधन वयाच्या 91 व्या वर्षी अमेरिकेत लॉस एंजलीस इथे असणाऱ्या त्यांच्या  विख्यात प्लेबॉय मॅन्शन या महालात झाले. त्यांच्या दफनविधीसाठी त्यांनीच एक खास जागा आधीच विकत घेऊन ठेवली होती. मर्लिन मन्रो या सौंदर्यवतीच्या कबरी शेजारी आता ते चिरविश्रांती घेतील! ह्यू हेफनर यांच्या आयुष्याचे सारे सार या एका कृतीतून व्यक्त होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारताने जेव्हा राजकीय स्वातंत्र्य मिळवले, त्यानंतर काही वर्षांतच  अमेरिकत वैचारिक स्वातंत्र्याची एक नवी लढाई सुरु झाली आणि ह्यू हेफनर हे त्याचे मुख्य प्रणेते होते. कुमारी मुलींनाही गर्भनिरोधाची साधने मिळाली पाहिजेत, सेक्स म्हणजे काही पाप नाही आदि विचारांची ती लढाई होती. हेफनर यांनी खास पुरुषांसाठी असणाऱ्या “प्ले-बॉय” या मासिकाची स्थापना केली. त्या आधी ते जाहिरात लेखक होते, मुलांच्या मासिकाचे वितरण व्यवस्थापक होते.

स्रोत

१९५३ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी हे मासिक सुरु केले. प्ले-बॉय म्हटल्याबरोबर तुम्हाला त्यातील नग्न चित्रे आठवणार, हे साहजिकच आहे. ते तर त्याचे वैशिष्ठ्य होतेच. पण अनेक थोर अमेरिकन लेखकांचे ललित लेख, वैचारिक साहित्य, मोठ्या प्रख्यात व्यक्तींची वेधक व्यक्तीचित्रे, उत्तम मुलाखती असे सारे प्ले-बॉय देत होता, म्हणूनच ते मासिक अफाट लोकप्रिय झाले. पहिल्याच अंकात त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीचे, मर्लीन मन्रोचे नग्न छायाचित्र सेंटरस्प्रेड म्हणून आले होते. एका कॅलेंडर कंपनीने मन्रोंच्या परवानगीने ते काढून घेतले होते. ते छायाचित्र हेफनर यांनी चक्क पाचशे डॉलरना विकत घेतले. १९५०च्या दशकात ही किंमतही अफाट मोठीच होती.  त्या अंकाच्या ५१ हजार प्रती हातोहात संपल्या आणि एका महान प्रकाशकाचा उदय झाला होता. प्ले-बॉयने अमेरिकन प्रकाशन व्यवसायात क्रांतीच घडवली. त्यांच्या आधीही नग्न चित्रांची मासिके निघतच होती. पण प्ले-बॉयने एक दर्जा त्या साऱ्याला मिळवून दिला. अल्पावधीतच या मासिकाचा तरूण प्रकाशक लाखोपती तर बनलाच पण बघता बघता मासिकाचा खप दहा लाख प्रतींवर पोचला. १९७०पर्यंत या मासिकाचा खप जगभरात सत्तर लाख प्रतींपर्यंत पोचला होता.

स्रोत

जेव्हा ह्यू हेफनर यांनी प्रकाशनास सुरुवात केली होती, तेव्हाची अमेरिकेची संस्कृती ही, “गॉन विथ द विंड” सिनेमात जशी  दिसते तशी, बरीचशी सभ्य, खूपशी पडदानशील, अशी होती. तिथे बायकांनी एका विशिष्ठ पद्धतीने राहणे अपेक्षित होते. स्त्रीत्व आणि स्त्री-पुरुष संबंध हे विषय अगदीच सामाजिक चर्चेच्या पलिकडे होते. त्यांविषयी बोलणे पापच होते. अर्थात आपल्याला हे सारे विचित्र वाटणार नाही. कारण आजही आपल्या भारतीय समाजात वागण्या-बोलण्याचे नियम आपण कडकच ठेवलेले आहेत. मुला-मुलींनी कसे वागावे, किती मोकळेपणाने वागावे, काय पाहावे काय पाहू नये, कसे वागू नये याच्या आपल्या संकल्पना आजही घट्ट आहेत. अमेरिकन समाजाला १९५० – १९६० या दशकात त्या समज-गैरसमजांतून मुक्त कऱण्याचे श्रेय हेफनर यांना मोठ्या प्रमाणात दिले जाते. अर्थात त्यांचेही टीकाकार मोठ्या प्रमाणात होतेच. पण एरवी त्यांच्या मासिकाला डोळे वटारणारे, नाके मुरडणारे लोकही ते मासिक वाचतही होते, ही गंमत होती. स्त्री-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी तर हेफनरांशी उभा दावाच मांडला होता.

स्रोत

ह्यू हेफनर यांनी प्ले-बॉय मासिकाच्या अफाट यशाचा फायदा उचलत अनेक अनुषंगिक व्यवसाय सुरु केले. प्ले-बॉय क्लब, रिसॉर्ट, सिनेनिर्मिती, टीव्ही मालिका असे अनेक व्यवसाय सुरु करीत त्यांनी एक प्रचंड मोठे व यशस्वी आर्थिक साम्राज्य उभे केले. तरूण व सुंदर मुली हे त्यांच्या साऱ्या व्यवसायाचे मुख्य सूत्र होते. त्यांच्या क्लबमध्ये मुलीच वेटरचे काम करीत होत्या आणि त्यांचा पोषाख सशासारखा होता. त्यांना बनी गर्ल म्हणत. त्या काळातील आणि खरेतर आत्ताच्याही कोट्याधीशांच्या श्रीमंतीची ओळख असणारे मोठे जेट विमान त्यांच्या मालकीचे होते.

(प्ले-बॉय मॅन्शन ,  स्रोत)

कालौघात सारेच नष्ट होते, तसेच हेफनर यांच्या साम्राज्याचेही झाले. त्यांची श्रीमंती घटली. व्यवसाय उतरणीला लागले. इंटरनेटच्या जमान्यात नग्न मुलींची चित्रे छापणाऱ्या मासिकाचे अप्रूपच संपून गेले. तरीही प्लेबॉयचा वाचक वर्ग आजही लाखोंच्या घरात आहे हे विशेष. हेफनर यांच्या मालकीचा आणि त्यांच्या भन्नाट जीवनशैलीचे प्रतीक असणारा प्ले-बॉय मॅन्शन हा महालही त्यांनी गेल्या वर्षी विकून टाकला. त्याची किंमत आली दहा कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे ६५४ कोटी रुपये! पण मरेपर्यंत तथेच राहण्याची सवलत त्यांना देण्यात आली होती. अनेक लग्ने करणाऱ्या हेफनरनी सभोवताली नेहमीच सौंदर्यवती राहतील याची काळजी घेतली. अलिकडेच त्यातीलच एका सोबतीणीशी त्यांनी तिसरे की चौथे लग्नही करून टाकले होते. गेले तेव्हाही त्यांच्या भोवती तीन सोनेरी केसांच्या पऱ्या वावरतच होत्या आणि चिरविश्रांतीच्या काळातही शेजारी अलौकीक सौदर्यखणीच राहील अशी काळजी या अवलियाने घेतली आहे...!

लेखक-  अनिकेत जोशी

सौजन्य: बित्तंबातमी

 

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख