लखनदेई नदी नेपाळच्या सर्लाही जिल्ह्यातून भारतात येते. लखनदेई म्हणजे लक्ष्मण रेषा. भारतात या नदीला ‘जलजीवन’ आणि हरयाली’ नावाने ओळखलं जातं. सीतामढी भागात ही नदी नागमोडी होत संपूर्ण सीतामढीला पाणी पुरवण्याचं काम करते. पुढे ती बागमती नदीला जाऊन मिळते. या नदीच्याच पाण्यावर आजवर तिथलं मानवी जीवन पोसलं गेलं आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात निसर्गाच्या या चक्रात अडथळे आले आहेत.
अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे लखनदेई नदी जवळजवळ आटली आहे. एवढी की नदी नेमकी कुठे आहे हे सांगणही कठीण जाऊ लागलं. याचे गंभीर परिणाम काही दशकांपासून दिसत होते. नदीवर अवलंबून असलेल्या लोकांना प्रदूषित पाणी मिळत होतं. सिंचन नसल्यामुळे शेतीवर संकट आलं होतं. नदी असूनही या भागातली पाण्याची भूगर्भ पातळी २२५ फुट खोल गेली आहे.









