वयाच्या अकराव्या वर्षी ती प्रकाशझोतात आली! त्याकाळात, म्हणजे १९१३ मध्ये "द कन्सास सिटी स्टार"ने तिच्याबद्दल एक हेडलाईन स्टोरी प्रकाशित केली होती,"Millions to a Negro Girl!!" त्या क्षणापासून तिचं आयुष्य गैरसमजुतींनी, कुतूहलाने आणि लोकांनी काढलेल्या अनुमानाने चितारलं गेलं!
पण त्यावेळी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची परिस्थिती खूप वाईट होती. आजच्या काळात जे काही चालू आहे त्यावरून साधारण शंभर वर्षांपूर्वी त्यांना कशी वागणूक मिळत असेल याचा एक अंदाज तसा येतोच. कृष्णवर्णीयांना गोऱ्या लोकांचे गुलाम म्हणून वागवलं जायचं. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. गोरे लोक राहात तिथं जाण्यास त्यांना परवानगी नव्हती. त्यांची प्रसाधनगृहंदेखील वेगवेगळी होती. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान आफ्रिकेतून अमेरिकेत लाखो लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आलं होतं. गुलामांची रसद कमी पडू नये यासाठी त्यांच्यावर मुलं जन्माला घालण्याची सक्ती करण्यात आल्याचंही एका महत्त्वपूर्ण डीएनए संशोधनातून स्पष्ट झालं आहे. तशी १८६०च्या दशकात गुलामगिरी बंद झाली असली तरी काळ्या लोकांची आयुष्यं काही फार सुधारली नव्हती.









