बाईक म्हणजे तरुणाईच्या गळ्यातला ताईत. बाईक म्हणजे स्वातंत्र्याचं प्रतीक, मुक्तपणे हिंडण्याची संधी. सुट्टीच्या दिवशी बाईकवरून यथेच्छ भटकत नवनवीन ठिकाणं धुंडाळत राहाणं हा एक हमखास स्ट्रेसबस्टर आहे. उगाच नाही, तिची सर्वत्र इतकी क्रेझ आहे. रस्ता मोकळा असो वा रहदारीचा, झुंईऽऽ झुंईऽऽ करत वाट काढत जाणार्या या देखण्या गाड्या आणि हेल्मेट घालून त्यावर सवार झालेली तरुणाई हे दृश्य मनोमन दाद द्यावी असंच! चित्तथरारक!!
बाईक हे तसं ‘रांगडं’ व्यक्तिमत्त्व असलेलं वाहन. खास पुरुषांना शोभेल असं. पण आजकाल मात्र अनेकदा मुली-बायकाही तिच्या प्रेमात पडून मनमुराद भटकंतीचा आनंद लुटताना दिसतात, मग यात धर्म, वय, लिंग, सामाजिक दर्जा, शारीरिक/मानसिक क्षमता यांचा कुठलाही अडथळा येत नाही. अर्चना तिम्माराजू ही यापैकीच एक.










