बर्याच वर्षांपूर्वी 'झाला महार पंढरीनाथ' नावाच्या चित्रपटाचे एक गीत ग.दि. माडगूळकरांनी लिहिले होते. त्या गीताच्या काही ओळी आजही लोकप्रिय आहेत.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?
बोभाटाच्या आजच्या कथेत याच ओळी पुन:पुन्हा आठवतील. आम्ही अशा एका चोराची कथा सांगणार आहोत, जो देवाची चोरी करू शकला नाही. फक्त ही कथा भारतात घडलेली नसून बर्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली आहे.
******************
१९५१ सालच्या एका संध्याकळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जीम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्या करतात. चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालीटी असते. हा चोर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोर्या करण्यात तरबेज होता.










