तुम्ही अनेक सिनेमे बघितले असतील ज्यात दोन भावंडं असतात- मग त्यांची ताटातूट होते - अचानक दैवाच्या फेर्याने ते समोरासमोर येतात - दोघांची मारामारी होते - शर्ट वगैरे फाटून शरीरावरची एखादी खूण दिसते. मग काय, ओळख पटते आणि चित्रपटाचा गोड गोड शेवट वगैरे वगैरे होतो!!
सिनेमाचं जाऊ दे हो. आम्हांला हे म्हणायचंय की अशा शरीरावरच्या खुणा आपली ओळख पटवत असतात. आता आपलं आधार कार्डसुद्धा बोटांच्या ठशांवर आणि डोळ्यांच्या बाहुलीच्या Iris आधारित असतं, ज्याला बायोमेट्रीक आयडेंटीफीकेशन म्हटलं जातं. त्याही पलीकडे जाऊन ओळख पटवण्याचा शेवटचा उपाय म्हणून डीएनए टेस्ट आहेच. हे उपाय जेव्हा नव्हते, तेव्हा "मी मीच आहे" हे सिध्द करण्यासाठी शरीरावरच्या खाणाखुणा हा एकच कायदेशीर आधार होता. आज जी भवाल संन्याशाची सत्यकथा तुम्हाला सांगणार आहोत ती आहे शारीरिक खुणांवरून ओळख पटवण्याची अशीच एक घटना… ही तुम्हाला सिनेमाची स्टोरी वाटली तरी हरकत नाही, कारण या घटनेवरूनच अनेक सिनेमांच्या कहाण्या रचल्या गेल्या आहेत!












