तुम्हाला जर कोणी म्हटलं की, "हा साधा दगड १ लाख रुपयांना विकत घे." तर तुम्ही काय कराल? त्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण जर समजा त्याने म्हटलं, "हा दगड १ लाख रुपयांना विकत घे, उद्या जाऊन त्याची किंमत ५ लाख होणार आहे." तर तुम्ही थोडं थांबून तो दगड निरखून बघाल आणि थोडा विचार कराल.
या उदाहरणातली दगड ही फार सामान्य गोष्ट आहे. तो हिरा नव्हे की सोनं नव्हे. पण उद्या जाऊन त्याची किंमत ५ लाख होणार आहे या एका समजुतीवर त्याला किंमत आली आहे. या अशा समजुतीतून एखाद्या वस्तूची किंमत वाढणे आणि वाढतच राहणे याला फायनान्शियल बबल म्हणजे आर्थिक फुगा म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंमती वाढतच राहतात. हा फुगा एकेदिवशी फुटतो आणि बाजार कोसळतो.











