टुवलू: अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेला हा देश दिवसेंदिवस नष्ट कसा होतोय?

लिस्टिकल
टुवलू: अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेला हा देश दिवसेंदिवस नष्ट कसा होतोय?

संपूर्ण पृथ्वीवर अशी कितीतरी ठिकाणे आहेत, जिथे गेल्यावर प्रत्यक्ष स्वर्ग पहिल्याचा अनुभव घेता येईल. पृथ्वीवर स्वर्ग सुखाची अनुभूती देणारे एक बेट म्हणजे, टुवलू. पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांपैकी असलेले हे एक बेट अद्भूत निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे आकारमानाने अगदी छोट्या असलेल्या या बेटाला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला आहे. हवाई आणि ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान हा देश वसलेला आहे.

टुवलू हा छोटासा देश पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण असतानाही बहुतांश पर्यटकांचे याकडे दुर्लक्षच होत आले आहे. आजच्या काळात जगभरातील पर्यटनस्थळांची यादी देणाऱ्या वेबसाईटची चलती असतानाही या बेटावर वर्षातून फक्त दोन हजार पर्यटकच भेट देतात. यावरूनच हे बेट किती दुर्लक्षित राहिले आहे याची कल्पना येईल.

फक्त २६ चौ. किमी क्षेत्रफळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या ११,००० च्या आसपास आहे. सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा आणि केळी, नारळीच्या बागा पाहून या बेटाच्या प्रेमात न पडलात तरच नवल. इथे ब्रेडफ्रूट नावाचे एक खास फळ पाहायला मिळते. फणसाच्या जातकुळीत मोडणारे हे फळ हे इथले आणखी एक वैशिष्ट्य. हा देश बाकीच्या जगापासून थोडा तुटलेलाच आहे. पूर्वी हे बेट एलीस बेटांच्या समूहात समाविष्ट होते, नंतर याला स्वतंत्र बेटाचा दर्जा मिळाला. फुनाफुटी ही टूवालुची राजधानी. हे या देशातील सर्वात मोठे शहर, देशातील एकमेव विमानतळ याच शहरात आहे.

मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. शेती अत्यल्प प्रमाणात पिकते, त्यामुळे बहुतांश अन्नधान्याची आयातच करावी लागते. तरीही या बेटावरील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. या छोट्याशा देशात सक्तीने सार्वत्रिक शिक्षण दिले जाते. इथे साक्षरतेचे प्रमाण ९९% आहे. जागतिक बँकेने टुवलूला उच्च-मध्यमवर्गीय उप्तन्न असलेली अर्थव्यवस्थेचा दर्जा दिला आहे.

इथल्या शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतील. बोटिंगचीही सोय आहे. इथे इतका निवांतपणा आहे की तुमच्या मनावरील ताण नक्कीच हलका होईल. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्टील्ट हाऊसेस- म्हणजे पाण्यात किंवा जमिनीवर खांब रोवून त्यावर बांधलेली घरे. अशा घरामध्ये रहायचा आनंद घेण्यासाठी तरी तुम्ही एकदा टुवलूला भेट द्यायलाच हवी.

अशा शांत, सुंदर बेटाला मात्र आता कुणाची नजर लागली असावी. बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याच्या या वाढत्या पातळीमुळे टुवलूच्या किनाऱ्यावरील प्रदेश समुद्रात विसर्जित होत आहे. हवामानात बदल झाला की या बेटाला मोठाच फटका बसतो. पाण्याची पातळी अचानक इतकी वाढते की संपूर्ण टुवलू बुडून जाईल की काय अशी भीती वाटते. तसेही याचा बराचसा भाग आता समुद्राने गिळंकृत केला आहेच. या बेटावरील लोकांना इतरत्र स्थलांतरीत व्हावे लागले आहे. अचानक वाढणाऱ्या या पाण्याच्या पातळीमुळे काही लोकांनी पाण्यावरही तरंगतील अशी घरे बनवून घेतली आहेत. बाकी काही लोक तर इतरत्र जाऊन वसण्याचा विचार करत आहेत. कारण एकेदिवशी हा संपूर्ण देश समुद्रात समाधिस्त होणारच आहे. फक्त नेमकं कधी हे मात्र कुणीही सांगू शकणार नाही.

तसेही उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना इथे म्हणाव्या तशा संधी मिळत नसल्याने त्यांना बाहेरच्या देशातच जावे लागत आहे. इथल्या बौद्धिक संपदेचा फायदा इतर देशांनाचा अधिक होतो आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेला हा देश एक दिवस इतिहासजमा होणार हे सत्य आता इथल्या रहिवाशांनी स्वीकारले आहे. तरुण पिढी या संकटावर कशी मात करता येईल याबाबत विचार करत आहे, मात्र निसर्गाच्या लहरीपुढे कोणाचेच काही चालत नाही.

असा हा सुंदर देश नाहीसा होण्याआधी एकदा तरी त्याला आवर्जून भेट द्यायला हवी.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

टॅग्स:

Bobhata

संबंधित लेख