ते तिघंजण लखनौचे. एकजण कवी, दुसरा सामाजिक कार्यकर्ता आणि तिसरा राज्य सरकारी कर्मचारी. तसं म्हटलं तर त्यांच्यात एक समान असं काहीच नाही, पण मानवतेच्या धाग्याने मात्र ते एकमेकांशी बांधलेले आहेत आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी एक अनोखं काम करत आहेत. तेही सगळा देश कोरोना परिस्थितीचा सामना करत असताना. काय आहे त्यांची गोष्ट?
मार्च आणि जून च्या दरम्यान या तिघांनी १५ बेवारस प्रेतांवर भैसाकुंड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. भैसाकुंड ही लखनौमधली सर्वात मोठी स्मशानभूमी. कोरोनापूर्व काळात इथे महिन्याला सुमारे ८०० प्रेतांवर अंत्यसंस्कार केले जायचे. लखनौमध्ये बेघर लोकांसाठी २३ निवारे आहेत पण प्रत्यक्षात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांची संख्या बरीच मोठी - ३००० च्या घरात - आहे.







