सोप्या शब्दांत जाणून घ्या अमेरिकन व्हिसाचे प्रकार आणि तो कसा मिळवायचा !!

लिस्टिकल
सोप्या शब्दांत जाणून घ्या अमेरिकन व्हिसाचे प्रकार आणि तो कसा मिळवायचा !!

फार फार पूर्वी मुंबईबाहेर राहणार्‍या लोकांना मुंबईचं खास आकर्षण होतं. इतकंच काय, एखादा मुंबईकर गावाला गेला की त्याला स्पेशल स्टेटस मिळायचं. कारण एकच होतं की एकदा माणूस मुंबईत पोहचला, त्याला नोकरी मिळाली की त्याच्या गावाकडल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट  व्हायची. काही वर्षांनी मुंबईचं ' खासपण' संपलं.  १९७० नंतर दिवस आले दुबईच्या वारीचे! जो दुबईत पोहचला त्याच्या कुटुंबाचा आर्थिक उध्दार झालाच असं समजलं जायचं!! गेल्या काही वर्षात दुबईचं - एकूणच - आखाती देशाचं वारं जरा मंदावलं आहे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे २००० सालानंतर 'सिलीकॉन व्हॅली ' म्हणजे अमेरिकेत कामानिमित्त जाणार्‍यांची संख्या अचानक वाढत गेली. आपल्या संगणक क्षेत्रातल्या हुशार मुलांच्या आयुष्याला 'अमेरिका' ही एक नवीन दिशा मिळाली. आता तर अमेरिकेत जाणं - जमलं तर तिथेच स्थायिक होणं हे बहुतेक शहरी भागात राहणार्‍या मुलांचं एकमेव स्वप्न झालं आहे. मुंबई-दुबई-अमेरिका या सर्व स्वप्नांच्या मागे एकच कारण आहे - ते म्हणजे भरघोस अर्थार्जन!!

आता सगळेच काही नोकरी-धंद्यासाठी अमेरीकेत जात नाहीत. मुलं तिकडे आहेत म्हणून अमेरिका बघण्यासाठी-फिरण्यासाठी जाणार्‍या पालकांची संख्या पण भरपूर वाढली आहे . पण अमेरिकेला जाण्याच्या मार्गातला मोठ्ठा अडसर म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळवणं! या व्हिसाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. हा व्हिसा मिळवणं फारच कठीण आहे-अमेरिकावाल्यांना आपले लोक तिकडे आलेले आवडत नाहीत- त्या गुजराथ्यांना मात्र लगेच व्हिसा मिळतो - व्हिसावाले भयंकर उध्दट असतात- अमुक एका एजन्सीच्या मार्फत गेलं तरच पटकन व्हिसा मिळतो अशी वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. आजच्या बोभाटाच्या लेखात या सर्व व्हिसा प्रकरणाचा आढावा आपण घेऊ या!!

अमेरिकेच्या व्हिसाचे दोन प्रकार असतात- इमिग्रंट व्हिसा आणि नॉनइमिग्रंट व्हिसा.

अमेरिकेच्या व्हिसाचे दोन प्रकार असतात- इमिग्रंट व्हिसा आणि नॉनइमिग्रंट व्हिसा.

१ ) इमिग्रंट व्हिसा :  हा व्हिसा अमेरिकेत कायम स्थायिक होणार्‍यांसाठी दिला जातो. हा व्हिसा मिळण्यापूर्वी शिक्षण - नोकरी -धंद्यासाठी बरीच वर्षे अस्थायी स्वरुपात अमेरिकेत राहणार्‍या लोकांना कायम स्वरुपी अमेरिकेत राहणे शक्य व्हावे यासाठी दिला जातो.

२) नॉन-इमिग्रंट व्हिसा : शिक्षण-नोकरी-तात्पुरती बदली- आजारावर इलाज करण्यासाठी-धंदा वाढवण्यासाठी - लग्नासाठी वर्‍हाडी म्हणून किंवा मौजेखातर अमेरिका बघायला जाणार्‍यांसाठी हा व्हिसा दिला जातो. नॉन-इमिग्रंट व्हिसाचे अनेक प्रकार असतात, वेगवेगळी कारणे असतात. त्या कारणानुसार त्याचे कोड ठरलेले असतात.

व्हिसासाठी अर्ज करणे तसे फार सोपे आहे. 

व्हिसासाठी अर्ज करणे तसे फार सोपे आहे. 

https://www.ustraveldocs.com या संकेतस्थळावर अतिशय सोप्या इंग्रजीत सर्व माहिती दिलेली असते. या संकेतस्थळाने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कोणीही सहज व्हिसासाठी अर्ज करू शकतो. पण हे शक्य नसेल तर तुमचा ट्रॅव्हल एजंट तुमच्यावतीने अर्ज भरून मुलाखतीची वेळ निश्चित करू शकतो.

- मुलाखतीची वेळ नक्की करण्यापूर्वी तुमचा पासपोर्ट चालू (व्हॅलीड) आहे अथवा नाही हे बघून घ्या.अर्ज करताना पुढे कमीतकमी सहा महिने पासपोर्ट चालू असणे अत्यावश्यक आहे. 

- यानंतर कोणत्या प्रकारचा व्हिसा हवा आहे त्यासाठी ऑन लाइन अर्ज करावा लागतो. 

खाली दिलेल्या तक्त्यात सर्वसाधारणपणे नेहमी लागणार्‍या महत्वाच्या व्हिसा प्रकाराचे वर्णन दिले आहे.  व्हिसा निश्चित करून त्यानंतर व्हिसा अ‍ॅप्लीकेशन फी भरणे महत्वाचे असते. एक महत्वाची अट अशी असते की हे भरलेले पैसे केवळ व्हिसा फी या सदराखाली येतात. व्हिसा फी भरली म्हणजे व्हिसा मिळेलच असे नाही. व्हिसा फी नॉन-ट्रान्सफरेबल असते. कोणत्याही कारणास्तव ही फी परत मिळत नाही. व्हिसाच्या प्रकाराप्रमाणे फी बदलत असते. ही फी ऑनलाइन भरता येते किंवा अ‍ॅक्सिससारख्या बँकेत जाऊन पण भरता येते. तुमच्याकडे ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा नसेल तर इतर कोणाच्याही खात्यतून पैसे भरता येतात. सध्या विनिमयाचा दर डॉलरमागे रुपये ७२ इतका गृहित धरला जातो. 

B  -  धंदा -व्यवसाय आणि अमेरिका बघायला जाणर्‍यांसाठी (टूरिस्ट)
-   विमान आणि जहाज कंपन्यांच्या नोकरदारांसाठी
-  उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी
I   -  पत्रकार आणि मिडियात कार्यरत असणार्‍यांसाठी
 -  एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत 

-  व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून
-  तात्पुरती नोकरी किंवा ट्रेनी म्हणून 
-  कंपनीच्या अंतर्गत बदली झाल्यामुळे
-  खेळाडू, कलाकार, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जाणार्‍यांसाठी 
 -  सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत 
R   - धर्मोपदेशक किंवा धार्मीक कार्यक्रमांसाठी 
K  -  अमेरिकेतील व्यक्तिशी लग्न करण्यासाठी 
M-H-L-P-Q-R या साठी व्हिसा फी १३,६८० आहे. K साठी १९,०८० तर बाकी सर्वांसाठी ११५२० व्हिसा फी आहे.

आता व्हिसा मुलाखतीबद्दल जाणून घेऊ या....

आता व्हिसा मुलाखतीबद्दल जाणून घेऊ या....

या कामासाठी दोन दिवस काढावे लागतात. पहिल्या दिवशी फोटो आणि हाताचे ठसे घेऊन नाव नोंदणी केली जाते आणि प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख-वेळ दिली जाते. पासपोर्टच्यामागे एक स्टिकर लावले जाते. मुलाखतीच्या दिवशी ते स्कॅन करून वकिलातीत प्रवेश दिला जातो. 

प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी काय करावे? 

१. आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट  याखेरीज अंगावर काही बाळगू नये.

२. लॅपटॉप, मोबाइल, पेन ड्राइव्ह, सुटे पैसे असे सामान सोबत बाळगू नये. यात बाहेरगावाहून येणार्‍यांची काही वेळा गैरसोय होऊ शकते . वकिलातीच्या आसपास हे सामान जमा करण्यासाठी भाड्याने लॉकर मिळतात त्याचा वापर करावा.

३. मुलाखतीची वेळ सकाळी ९ वाजेपासून सुरु होते. साधारणपणे एक ते दिड तास आधी रांगेत उभे रहावे. सिक्युरिटी अत्यंत कडक असते. सिक्युरिटी मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आत प्रवेश मिळतो. रांग लांबलचक असली तरी वकिलातीचे कर्मचारी अत्यंत तत्पर असतात. एकदा आत प्रवेश केल्यावर साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासात काम संपते.

४. इंग्रजी बोलता येत नसेल किंवा अमेरिकन कर्मचार्‍यांचे इंग्रजी उच्चार समजणार नाहीत, असे वाटत असेल तर मराठी-हिंदी- गुजराती भाषा बोलणारे दुभाषे उपलब्ध असतात. त्यांचा वापर करावा. 

५. व्हिसा मान्य झाल्यास पासपोर्ट जमा करून घेतला जातो. नाकारल्यास पासपोर्ट परत दिला जातो. 

आता काही महत्वाच्या आणि अनुभवाच्या गोष्टी-

आता काही महत्वाच्या आणि अनुभवाच्या गोष्टी-

१. कागदपत्रे कोणती न्यावी? जन्मतारखेचा  दाखला- बँकेचे अद्यतन केलेले पासबुक, अमेरिकेत जाण्याचा हेतू स्पष्ट करणारे कागदपत्र किंवा दाखले. उदाहरणार्थ - उच्च शिक्षणासाठी जाणार्‍यांनी अमेरिकेतल्या विद्यापिठाने दिलेला आय-२० हा कागद सोबत घेऊन जाणे.

२. मुलाखतीत प्रश्नांना उत्तरे कशी द्यावीत?  फक्त विचारलेल्या प्रश्नांची 'नेमकी' उत्तरे द्यावीत. प्रश्न न समजल्यास पुन्हा एकदा विचारण्यास हरकत नसते. फापटपसारा-पाल्हाळ करून बोलणे संशयास्पद समजले जाते.

३. किती दिवसासाठी राहणार याचे नेमके उत्तर द्यावे. "बघू, पाहूण्यानी ठेवून घेतले तर राहू चार दिवस जास्त." अशी मोघम उत्तरे देऊ नयेत. 

४. जर प्रवासी म्हणून जाणार असाल तर कोणत्या ठिकाणांना भेट देणार याची यादी तयार ठेवावी.

५.  तुम्ही जाऊन परत येण्याइतके पैसे तुमच्या खात्यात आहेत अथवा नाहीत याची शहानिशा केली जाते. 

६.  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसायला हवा. तुम्ही मुलाखतीला जाण्याआधीच तुमची कुंडली मांडून तयार असते. यासाठी सर्व प्रश्नांची खरी उत्तरे द्या. नजरेला नजर भिडवून उत्तरे द्या. मुलाखत घेणारे कर्मचारी डोळ्यांच्या हालचालीवरून  खरे-खोटे समजत असतात. 

७.  अमेरिकेत जाणारी व्यक्ती त्या देशात जाऊन खर्च करत असते. त्यांच्या व्यापाराला पुढे नेत असते. त्यामुळे अतिथीचे अमेरिकेत स्वागतच होत असते. फक्त "भटाला दिली ओसरी " असा प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाते. भेटीला आलेला माणूस पुन्हा त्याच्या देशात परतून जाईल याची खात्री करून घेतली जाते. बेकायदेशीर नागरीक म्हणून अमेरिकेत कोणीही स्थायीक होऊ नये यासाठी व्हिसाचे नियम कडक केलेले असतात. एकदा तुमच्या प्रवासाचा हेतू स्पष्ट झालेला असला तर काही समस्या येत नाही. उदाहरणार्थ - विद्यार्थ्यांना भेटायला जाणार्‍या पालकांना दहा वर्षांचा सलग व्हिसा सहज मिळतो. 

८. एकदा व्हिसा नाकारला याच अर्थ कधीच मिळणार नाही असे नसते. विशिष्ट मुदतीनंतर पुन्हा अर्ज करता येतो. 

९.  संपूर्ण कुटुंब सोबतच जाणार असेल तर सर्वांची एकाच खिडकीवर मुलाखत घेतली जाते .

१०. सर्वसाधारणपणे व्हिसाची मुलाखत पाच मिनिटांपेक्षा जास्त नसते.

 

चला तर मंडळी, करा तयारी जाण्याची!! जर तुम्ही जाऊन आला असाल तर तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा !!

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख