उत्तराखंडच्या देवभूमीत तपोवनमध्ये आलेल्या प्रलयामुळे सगळीकडे हाहाकार माजला. हिमनदीत आलेल्या पुरामुळे सगळीकडे गाळ साठला. त्या पाण्यात, गाळात आपल्या भारतीय लष्कराच्या बचाव पथकाला बोलावण्यात आले. भारतीय लष्कर तिथे प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आहे. आतापर्यंत ३०हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे. अजून २००च्यावर लोक बेपत्ता आहेत.
रविवारी झालेल्या आपत्तीनंतर भारतीय लष्कर तिथे न थांबता अनेक तास पाण्यात उभे राहून काम करत आहे. पुरात अडकलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी सैन्य दल गेले सहा दिवस प्रयत्न करत आहे. बोगद्यातून गाळ आणि ढिगारे साफ करण्यासाठी आणि जिथे लोक अडकले आहेत त्या लहान बोगद्यपर्यंत पोहोचण्यासाठी एकाच वेळी खोदकाम सुरू आहे. लेख लिहित असताना आलेल्या माहितीनुसार ११४ मीटरपर्यंतचा भाग साफ करण्यात आला आहे. अनेक जनावरेही या पुराच्या कहारात अडकली गेली आहेत.







