५०० आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्याजागी नव्या ५०० आणि २००० च्या नोटा आल्या...पण काय हो, कधी विचार केला का या जुन्या नोटांचं पुढे काय झालं ?
८ नोव्हेंबर २०१६ पासून ५०० आणि १००० च्या नोटा बंद होणार असं जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून लोकांनी जुन्या नोटा बँकेत जमा करायला सुरुवात केली. आणि बँकेत जुन्या नोटांचा अक्षरशः पाऊस पडला. या जुन्या नोटांची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न होता. असं म्हणतात की यावर भारतीय रिझर्व बँकेने एक नामी उपाय शोधून काढला.
‘वेस्टर्न इंडिया प्लायबुड लिमिटेड’ या कंपनीला आरबीआय ने या सगळ्या नोटांचं प्लायवूड मध्ये रुपांतर करण्याचं काम दिलं आहे. ही कंपनी केरळ मधल्या कन्नूर जवळ आहे. कार्डबोर्ड, प्लायवूड, तक्ता, फर्निचर बनवण्यासाठी लागणारा जुन्या नोटांचा लगदा वापरला गेला.
तसं पाहायला गेलं तर जुन्या नोटा आरबीआयकडे या पूर्वीही येत होत्या. जसे की फाटलेल्या, वापरून जुन्या झालेल्या, जीर्ण झालेल्या नोटा. आरबीआय अश्या नोटांना जाळून त्यांचे उरलेले अवशेष जमिनीत पुरून टाकत असे. पण इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आल्यानंतर त्यांना या पद्धतीने नष्ट करणं पर्यावरणासाठी हानिकारक होतं. म्हणूनच त्यांना नष्ट करण्यापेक्षा ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ तयार करण्याची पद्धत वापरण्यात आली.
तर, १००० कोटी पेक्षा जास्त जुन्या नोटांचा प्रश्न आरबीआयने या प्रकारे सोडवला !!





