गेल्या सहा महिन्यात नोकरी गेली, नोकरी आहे पण पगार अर्धाच झालाय, व्यवसाय बंद झालाय अशा अनेक समस्यांना आपण सगळेच सामोरे जातो आहोत. उत्पन्न घटलंय, पण कर्ज आहे त्याच जागी आहे. त्याची परतफेड करायची तरी कशी हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतो आहे. सुरुवातीला दिलेला- ब्लँकेट मोरॅटोरीयम-म्हणजे सर्वांना एकसमान कर्जफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला होता. त्याची मुदत पण ३१ ऑगस्ट रोजी संपली.
आता पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहे. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीची पुनर्रचना म्हणजे लोन रिस्ट्रक्चरींग करण्याची आता वेळ आली आहे. पण पुनर्रचना म्हणजे नक्की काय? कोणाला ती सुविधा मिळणार आहे? कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी ती लागू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासणे हा आजच्या लेखाचा विषय आहे.









