चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला वयाचं किंवा स्थळकाळाचं बंधन नसतं. याचीच प्रचिती जन्नत तारीक या सात वर्षाच्या काश्मिरी मुलीकडे पाहिल्यावर येते. खरंतर तिचं वय बाहुल्या, खेळणी आणि भातुकली यात रमण्याचं. पण प्रत्यक्षात ती करतेय एक महत्त्वाचं काम. तिच्या लाडक्या दल सरोवराची साफसफाई.
हो, तेच ते दल सरोवर. काश्मीरच्या सर्वांगसुंदर सौंदर्यात भर घालणारा राजस मुकुटमणी. कोणे एके काळी नितळशंख पाण्यासाठी हे सरोवर प्रसिद्ध होतं. त्यावर तरंगणारे शिकारे, त्यातला रंगांची उधळण असलेला तरंगता बाजार त्याच्या सौंदर्याला चार चाँद लावत. सिनेमातली कितीतरी गाणी या सरोवराच्या विहंगम पार्श्वभूमीवर चित्रित केली गेली. काश्मीरला भेट देणार्या पर्यटकांना या सरोवराने भुरळ घातली आणि त्यांचा ओघ सतत वाढत राहिला.









