१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा का करतात ? काय आहे या दिवसाचा इतिहास ??

लिस्टिकल
१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा का करतात ? काय आहे या दिवसाचा इतिहास ??

१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.

१ मे ला महाराष्ट्र दिन का म्हणतात हे तर आपल्या प्रत्येकालाच माहित असतं, पण कामगार दिनाबद्दल फारच कमी माहिती असते. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मग समजून घेऊया १ मे ‘आंतरराष्ट्रीय कामगारी दिन’ आणि ‘मे दिन’ म्हणून साजरा का केला जातो ते.

१७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.

कामगारांची पहिली मागणी होती ८ तासांच्या कामाची. पुढे चळवळीलाही ‘eight -hour day ' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये २१ एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

स्रोत

ऑस्ट्रेलिया मध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत १ मे १८८६ रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी  कामासाठी ८ तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्याप्रमाणात मोर्चे निघाले. शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे ६ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला. याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. ७ पोलीस आणि ४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. याला जबाबदार म्हणून ८ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. कारण असं म्हणतात की या ८ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता.

अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन पण म्हटलं जातं.

 

मंडळी, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी १ मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. खुद्द अमेरिकेत सप्टेंबर मधला एक दिवस  कामगार दिन म्हणून ठरवण्यात येणार होता. पुढे कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून १ मे या दिवसाची निवड केली.

१९०४ साली ॲम्स्टरडॅम येथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आवाहन करण्यात आलं की १ मे हा दिवस 8-hour day म्हणून साजरा करावा.

भारतात कामगार दिनाची पाळेमुळे १९२३ सालापर्यंत मागे जातात. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला.

तर मंडळी, अशा प्रकारे १ मे या दिवसाला कामगार दिन किंवा मे दिन म्हणून मान्यता मिळाली आहे. जाताजाता आणखी एक माहिती जाणून घ्या. वसंत ऋतूत येणारा युरोपचा एक प्राचीन उत्सव हा १ मे रोजी असतो त्यामुळे या दिवसाला मे दिन म्हणून फार पूर्वीपासून ओळखलं जातं, पण पुढे त्यात कामगार दिनाची भर पडली.

राव, माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका !!

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख