ऑनलाइन खरेदी-विक्री हा सध्या चलतीत असलेला बिझनेस. होलसेलरकडून माल मागवायचा आणि व्हाट्सॲपद्वारे तो लोकांना विकायचा. प्रियाजींनी समस्त महिलावर्गाचा जिव्हाळाचा विषय असलेल्या साड्यांची विक्री सुरु केली. सुरूवातीला फक्त आपल्या मैत्रिणी आणि घरातल्या स्त्रियांना विकण्यासाठी त्या साड्या आणायच्या आणि घरी जाऊन विकायच्या. अगदी आईकडे माहेरी गेल्या तरी आठ -हा साड्या बरोबर न्यायच्या. चार बायका जमल्यावर बोलता बोलता चारआठ साड्या विकल्या गेल्या तर उत्तम नाही का ? हळूहळू कानोकानी खबर जाऊन साड्यांचा खप वाढला.
अन्न आणि वस्त्र, खास करून कपडे, साड्या ह्या धंद्याला मरण नाही. प्रियाजींच्या साड्या मागवून काही स्त्रियांनी, स्वतःही साडी विकण्याचा बिझनेस केला. अर्थातच घरबसल्या स्त्रियांना पैसे कमावता येऊ लागल्याने त्यांना नवीन उभारी मिळाली. बघता बघता २००० रिसेलर बनवण्याचा विक्रम प्रियाने केला. आजच्या तारखेस त्यांची वार्षिक उलाढाल अडीच कोटीच्या घरात पोहोचली आहे. यासाठी त्यांनी व्हाट्सॲप चे १० ते ११ ग्रुप बनवले आणि आपले रिसेलर वाढवले. हे काम असतं गृप ऍडमिनचं.