"श्रीमंत बापाची लाडावलेली -वाया गेलेली पोरगी घरातून पळून जाते ...." हे इतकंच वाक्य वाचलं की तुमच्या आमच्या डोळ्यासमोर गुलशनकुमारचा " दिल है की मानता नही" सिनेमा दिसायला लागतो. हेच वाक्य जेव्हा तुमचे बाबा किंवा काका वाचतात तेव्हा त्यांच्या नजरेसमोर ग्रेगरी पेक आणि ऑड्रे हेपबर्नचा "रोमन हॉलीडे " दिसायला लागतो. एकाच वाक्यातून तयार झालेल्या या दोन्ही सिनेमांचा शेवट अपेक्षेप्रमाणे एकदम 'हॅप्पी हॅप्पी' आहे. किंवा तसा तो असावा अशीच आपली अपेक्षा असते पण आज आम्ही तुम्हाला जी घरातून पळून गेलेल्या राजकन्येची कथा सांगणार आहोत त्या कथेचा शेवट कसा होईल हे अजूनही आपल्याला माहिती नाही. कदाचित राजकन्या घरी जाऊन सुखात राहत असेल किंवा रागवलेल्या बापानी तिला कायमचे संपवून टाकले असेल !!
राजकन्येच्या कहाणीत आहे प्रेम, बदले की आग, खानदान की इज्जत, थरारक पाठलाग, ऍक्शन्स, ड्रामा, इमोशन्स… विविध प्रकारचा मसाला खच्चून भरलेली ही कहाणी "कोणे एकेकाळी एक आटपाट नगर होतं" अशा वाक्याने सुरू होत नाही. ती घडलीय आत्ता! याच वर्षी! आणि या कहाणीत गुंतले आहेत अनेक देश… अगदी आपला भारतसुद्धा !
चला तर मग, तुमची उत्सुकता जास्त न ताणता सुरू करूयात फिल्मी वाटणारी पण खरीखुरी स्टोरी…








