तर चुंबन कोणत्या प्रकारचे आहे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. कधी सेक्सची पहिली पायरी म्हणून किस केले जाते, कधी फक्त प्रेम दर्शवण्यासाठी केले जाते, कधी शुभेच्छा देण्यासाठी तर कधी निरोप घेताना सुद्धा चुंबन दिले घेतले जाते. आईने बाळाचे घेतलेले चुंबन हा वात्सल्य दर्शवण्याचा प्रकार असतो. मोठ्या माणसांनी लहानांच्या कपाळाचे घेतलेले चुंबन हे आपुलकी दर्शवणारे असते.
चुंबन हा प्रकार कसा अस्तित्वात आला याविषयी अनेक थेअरी आहेत. एका शास्त्रज्ञांच्या मतानुसार पूर्वी मनुष्य आदिम अवस्थेत असताना आई आपल्या बाळाला स्वतःच्या तोंडाने भरवत असे. एखादा घन खाद्यपदार्थ आधी स्वतः चावून त्याला बाळाच्या खाण्यायोग्य करून नंतर त्याच्या मुखात सोडत असे आणि इथूनच चुंबनाची सुरुवात झाली असावी. काही जणांच्या मतानुसार चुंबन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही शिकण्याची गरज नाही. आपण भूक लागल्यावर जेवतो तसेच चुंबनही आपोआप घेतो. पण एक मात्र खरं की, अभ्यासानुसार जगातली दहा टक्के लोक अजिबात चुंबनाच्या फंदात पडत नाहीत. ते काय गमावत आहेत याची जाणीव त्यांना नाही असेच म्हणावे लागेल.