आयपीएल २०२२ (Indian Premiere League 2022) स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळाले आहेत. सर्व संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि ४ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला एकही जेतेपद मिळवता आले नाहीये. या दोन्ही संघांनी सलग ३ सामने गमावले आहेत. या निराशाजनक कामगिरीनंतर आता चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला आतापर्यंत सुर गवसला नाहीये. या संघातील गोलंदाजांना हवी तशी गोलंदाजी करता आली नाहीये. गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहता आता चाहत्यांनी चक्क अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे.
एका यूजरने ट्विट करत लिहिले की," अर्जुन तेंडुलकरला काय सजावटीसाठी संघात स्थान दिलं आहे. त्याला डॅनियल सॅम्स ऐवजी संघात स्थान द्या." तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "३-० आहे, आपण अजूनही पुनरागमन करू शकतो. आता वेळ आली आहे युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला संधी देण्याची." तर एका युजरने सल्ला देत म्हटले की, "येणाऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी द्या, तो डॅनियल सॅम्स पेक्षा चांगला गोलंदाज आहे."
अर्जुन तेंडुलकरला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत देखील त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्याला या दोन्ही हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये.




