काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 cricket World Cup) स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज, बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस.
आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच बुधवारी (६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने एक अप्रतिम षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेविस यांना स्थान देण्यात आले होते. या खेळाडूला बेबी एबी म्हणून संबोधित केले जाते, याचे प्रत्यय या सामन्यात पाहायला मिळाले. तो एबी डीविलियर्स सारखी फलंदाजी करू शकतो. तसेच त्याच्यासारखे शॉट्स देखील खेळू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १९ चेंडूंचा सामना २९ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने वरुण चक्रवर्तीच्या षटकात एक अप्रतिम षटकार मारला. या षटकाराला क्रिकेटच्या भाषेत नो लूक षटकार असे म्हणतात. कारण षटकार मारल्यानंतर त्याने पाहिले देखील नाही की, चेंडू किती लांब गेला. या स्टायलिश षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.




