भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले हे आपल्या समालोचनासह सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी देखील ओळखले जातात. त्यांचे मुलाखतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी असे काहीतरी कृत्य केले आहे, ज्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
तर झाले असे की, गुरुवारी(२४ मार्च) आयपीएल २०२२ स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी हर्षा भोगले इंस्टाग्रामवर लाईव्ह होते. त्यावेळी अचानक त्यांचा फोन हातातून पडला आणि आवाज यायला सुरुवात झाली की, "कोण आहात? काय झालं? कुठून आला आहात?" हे ऐकून चाहते आणि त्यांच्यासोबत लाईव्हवर असलेला अँकर देखील प्रचंड घाबरला होता. या सर्व घटनेनंतर चाहत्यांनी झालेल्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर हर्षा भोगले यांनी स्वतः ट्विट करत माफी मागितली.
हर्षा भोगले ट्विट करत म्हणाले..
ही घटना घडल्यानंतर हर्षा भोगले यांनी ट्विट करत म्हटले की, "माझ्यामुळे तुम्ही चिंतित झालात त्यामुळे मी तुमची माफी मागतो. तसेच काळजी आणि प्रेम दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार. मी कल्पनाही केली नव्हती ही व्हिडिओ इतकी व्हायरल झाली आहे. हे देखील शिकण्यासारखे आहे. त्याचे उद्देश काहीतरी वेगळे होते. मला माफ करा.."
तसेच हर्षा भोगले यांच्या पत्नी अनिता भोगले यांनीही हे प्रकरण घडल्यानंतर एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, "मी तुम्हा सर्वांना हे स्पष्ट करत आहे की हर्षा भोगले ठीक आहेत. हा एक प्रोमो होता तो व्हायरल झाला आहे. प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद."
हर्षा भोगले यांनी इंस्टाग्राम लाईव्हवर केलेले हे कृत्य चाहत्यांची धडधड वाढवणारे होते. परंतु जेव्हा चाहत्यांना कळाले की, हा केवळ एक प्रोमो होता, त्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.




