उद्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलँडमध्ये रंगणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान चालणाऱ्या या सामन्यात विजयी होणारा संघ हा कसोटी क्रिकेटचा बादशाह आहे हे सिद्ध होईल. गेले दोन वर्षे या क्षणासाठी सर्वच कसोटी संघांनी जोरदार प्रयत्न केले पण शेवटी भारत आणि न्यूझीलँड या दोघांनी फायनलमध्ये धडक दिली.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतर स्पर्धांसारखी नाही. १ ऑगस्ट २०१९ रोजी या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत टॉप ९ संघ सहभागी झाले. या संघांना दोन वर्षात ६ कसोटी मालिका खेळायच्या होत्या. यापैकी तीन मालिका स्वतःच्या देशात तर तीन परदेशात अशा पद्धतीने या स्पर्धेची रचना करण्यात आली होती.






