आयपीएल २०२२ (Indian Premiere League 2022) स्पर्धेतील १२ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने अप्रतिम कामगिरी करत १२ धावांनी विजय मिळवला. आयपीएल २०२२ स्पर्धेत हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सलग दुसरा विजय आहे. केएल राहुल आणि दीपक हुड्डाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ७ बाद १६९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला ९ बाद १५७ धावा करण्यात यश आले.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला होता. कारण सनरायझर्स हैदराबाद संघातील गोलंदाजांनी पावरप्लेच्या षटकांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघातील ३ मुख्य फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्यानंतर कर्णधार केएल राहुलने तुफानी खेळी करत ६८ धावा केल्या. तर दीपक हुड्डाने ५१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १६९ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघालाही चांगली सुरुवात करता आली नाही. संघाचे सलामीवीर फलंदाज केन विलियमसन १६ तर अभिषेक शर्मा १३ धावा करत माघारी परतले होते. त्यानंतर राहुल त्रिपाठीने ४४ धावांचे योगदान दिले. तर निकोलस पुरनने ३४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. परंतु सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकात दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १२ धावांनी आपल्या नावावर केला.




