चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) संघ हा आयपीएल (Ipl) स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत ४ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर मुंबई इंडियन्स संघ ५ जेतेपदांसह अव्वल स्थानी आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाला आतापर्यंत आयपीएल २०२२ स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाहीये. एमएस धोनी सारखा खेळाडू संघात असताना, या संघाने सलग ४ सामने गमावले आहेत.
आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एमएस धोनीने ( ms dhoni) कर्णधार पदावरून माघार घेतली होती. त्यानंतर संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले होते. धोनी नंतर सीएसकेचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता रवींद्र जडेजावर असणार आहे. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तो नेतृत्वासह, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाला आपल्या जुन्या खेळाडूंची कमतरता नक्कीच जाणवली असेल. कोण आहेत ते ३ खेळाडू? चला पाहूया.
१)शार्दुल ठाकूर (Shardul thakur) :
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात प्रवेश केला होता. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१८ नंतर तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक महत्वाचा भाग झाला होता. जेव्हा जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघ अडचणीत असायचा त्यावेळी एमएस धोनी चेंडू शार्दुल ठाकूरच्या हातात द्यायचा. एकाच षटकात तो सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या दिशेने वळवायचा. २०२१ मध्ये झालेल्या हंगामात त्याने १६ सामन्यात २१ गडी बाद केले होते. हवेत फिरणारे चेंडू टाकून फलंदाजांना अडचणीत टाकणारा शार्दुल ठाकूर फलंदाजीला येऊन मोठी फटकेबाजी देखील करायचा.
२) फाफ डू प्लेसिस (Faf du plessis) :
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिससाठी आयपीएलचे १४ वे हंगाम खूप खास ठरले होते. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत १६ सामन्यात एकूण ६३३ धावा केल्या होत्या. या हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. ऋतुराज गायकवाड सोबत डावाची सुरुवात करताना त्याने अनेकदा महत्वाच्या खेळ्या केल्या होत्या. याच कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल स्पर्धेचे चौथे जेतेपद मिळवण्यात यश आले होते.
३) सॅम करन (Sam Curran) :
इंग्लंडचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा गेल्या दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक महत्वाचा भाग होता. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपद पटकावले त्यामध्ये सॅम करनने मोलाचे योगदान दिले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याने २३ सामन्यात २२ गडी बाद करत २४२ धावा केल्या होत्या.




