एमएस धोनीने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला एमएस धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या हाती सोपवली होती. आता स्पर्धेच्या मध्येच रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शनिवारी ( ३० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज संघाने एका पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ४ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत खुलासा करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने माहिती देत म्हटले की, " रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एमएस धोनी कडे कर्णधारपद सोपवले आहे. तसेच एमएस धोनीने देखील ही जबाबदारी स्वीकारली आहे."
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पुढील सामना १ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाची जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामात आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यात या संघाला केवळ २ सामन्यात विजय मिळवता आला आहे.




