गुरुवारी (३१ मार्च) पार पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ विजयाच्या अगदी जवळ होता, परंतु गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे हा सामना त्यांना गमवावा लागला आहे. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.
रोमांचक अशा सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला शेवटच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. यानंतर कर्णधार रवींद्र जडेजानेही संताप व्यक्त केला. त्याने मान्य केले की, चेन्नई सुपर किंग्ज संघाने क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका केल्या. त्यांनी केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांचे झेल सोडले.
सामना झाल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला की, "आम्हाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण करताना झेल टिपणे गरजेचे आहे. आज दवाचे प्रमाण देखील अधिक होते. ज्यामुळे चेंडू हातात येत नव्हता. आम्हाला ओल्या चेंडूने सराव करावा लागेल."
तसेच फलंदाजांचे कौतुक करत रवींद्र जडेजा म्हणाला की, "सुरुवातीच्या ६ फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी अनुकूल होती." परंतु गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे रवींद्र जडेजाने संताप व्यक्त केला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.




