ड्रेसिंग रूम किस्सा भाग २- जेव्हा ईशान किशनने मास्टर ब्लास्टर समोर केला होता शिवीगाळ: व्हिडिओ

ड्रेसिंग रूम किस्सा भाग २- जेव्हा ईशान किशनने मास्टर ब्लास्टर समोर केला होता शिवीगाळ: व्हिडिओ

तुम्हाला आयपीएल २०२१ (2021) तो व्हिडिओ नक्कीच आठवत असेल, ज्यात ईशान किशन स्टाईल मारत सचिन तेंडुलकर समोर आला होता. कानात कॉर्ड्स, गॉगल आणि हातात किट बॅग परंतु सचिनला पाहताच स्टाईल मारणारा ईशान किशन मान खाली घालून चूप चाप आपल्या ठिकाणी जाऊन बसला होता. हा प्रसंग पाहून सर्वांना हसू अनावर झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. परंतु नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? याबाबत स्वतः ईशान किशनने खुलासा केला आहे.

गौरव कपूरचा प्रसिद्ध शो, 'ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स'मध्ये अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू हजेरी लावत असतात. या शो मध्ये क्रिकेटपटू मजेशीर किस्से आणि आठवणी सांगत असतात. नुकताच ईशान किशनने देखील या शो मध्ये हजेरी लावली होती. ज्यात त्याने ड्रेसिंग रूममध्ये घडलेला किस्सा सांगितला आहे.

ईशान किशनने हा किस्सा सांगत म्हटले की, " माझ्याकडे जास्तीचे सामान होते. त्यामुळे मी माझ्या संघसहकाऱ्यांना (मोहसीन आणि युद्धविर) मदत करण्यास सांगितले. मग मी माझ्या फोनमध्ये गाण लावायला सुरुवात केली. त्यानंतर पाहतो तर काय, हे लोक गायब झाले होते. हे पाहून मला खूप राग आला होता. मी एकटाच ते सामान घेऊन ड्रेसिंग रूममध्ये पोहचलो. त्यानंतर मी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली." 

तसेच तो पुढे म्हणाला की, "जेव्हा मी शिवीगाळ करायला सुरुवात केली, तेव्हा मोहसीनने मला इशारा केला आणि म्हटले की, तिथे सचिन पाजी ( सचिन तेंडुलकर) बसले आहेत. त्यानंतर मी गॉगल, कॉर्ड्स काढून बाजूला ठेवले आणि त्यांना गुड आफ्टरनुन विश केले. मी मनातल्या मनात हाच विचार करत होतो की, मी हे काय म्हटलं..

"

ईशान किशन हा मुंबई इंडियन्स संघातील हुकुमचा एक्का आहे. मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघाने त्याला रिलीज केले होते. परंतु मेगा लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने १५.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या लिलावातील दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता.

टॅग्स:

sachin tendulkarIPL

संबंधित लेख