इंडियन प्रीमियर लीग ( indian premier league) स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली होती. सध्या ही स्पर्धा क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. भारतीय संघाने २००७ टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली होती. तर पहिल्या हंगामात फ्लॉप ठरलेल्या डेक्कन चार्जर्स (Deccan chargers) संघाने सर्वांना आश्चर्यचकित करत दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले होते. ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात रोहित शर्मा आणि कुमार संगकारा सारखे खेळाडू होते. आयपीएलचे सलग ४ हंगाम खेळल्यानंतर हा संघ अचानक आयपीएल स्पर्धेतून बाहेर कसा काय झाला? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. या संघाचे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचे नेमके कारण काय? चला जाणून घेऊया.
गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे उपकर्णधारपद रोहित शर्माच्या हाती होते. तर चौथ्या हंगामात कुमार संगकाराने या संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर खेळाडूंवर लावण्यात आलेल्या बंदीमुळे हा संघ विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, परंतु एकाच बोलीमुळे ही बोली नाकारण्यात आली होती.
१४ सप्टेंबर २०१२ रोजी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने संघावर कायमची बंदी घातली होती. कराराच्या अटींचा भंग केल्याबद्दल त्यांना काढून टाकण्यात आले होते. बीसीसीआयने २५ ऑक्टोबर २०१२ रोजी याची पुष्टी केली. यानंतर नवीन संघाचे नाव सनरायझर्स हैदराबाद असे ठेवण्यात आले होते.
फ्रँचायझीने सुरुवातीला ॲडम गिलख्रिस्ट, अँड्र्यू सायमंड्स, शाहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरिस आणि हर्शेल गिब्स या स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले होते. तर आरपी सिंग, नुवान जोयसा आणि चामिंडा वास हे फ्रँचायझीने खरेदी केलेले प्रमुख गोलंदाज होते. रोहित शर्मा, वेणुगोपाल राव आणि प्रज्ञान ओझा या भारतीय खेळाडूंचा देखील या संघात समावेश करण्यात आला होता.
यानंतर, २०२० मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाने संघाच्या बाजूने निर्णय दिला आणि डेक्कन चार्जर्सला रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर घोषित केला. संघाची मालकी असलेल्या डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग लिमिटेड या कंपनीला बीसीसीआय कडून ४८०० कोटींहून अधिक नुकसानभरपाई आणि २०१२ पासून १० टक्के व्याजासह रक्कम देण्यात आली.
त्यांनतर सन टीव्ही ग्रुपने या संघाचे मालकी हक्क मिळवले. या संघाचे नाव नाव सनरायझर्स हैदराबाद असे ठेवण्यात आले. डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यांसारख्या दिग्गजांनी या संघाचे नेतृत्व केले आहे.




