अशोक सराफ यांचे गाजलेले १० चित्रपट...यातले तुमचे आवडते चित्रपट सांगा !!

लिस्टिकल
अशोक सराफ यांचे गाजलेले १० चित्रपट...यातले तुमचे आवडते चित्रपट सांगा !!

आज मराठी चित्रपटसृष्टीच्या मामांचा बड्डे आहे. नाव ओळखलं का? अहो, आपले अशोक सराफ मामा.

नागपुरात जन्मलेल्या  अशोक मामा नाटक-सिनेमात येण्याआधी बँकेत नोकरी करत होते. पण अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी कलाक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं ते ही विदूषकाच्या भूमिकेत. . त्यांचं पहिलं नाटक होतं शिरवाडकरांचं “ययाती आणि देवयानी”. विदूषकाच्या छोट्याश्या भूमिकेने त्यांच्या या अवाढव्य कारकिर्दीची सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटात पाऊल ठेवलं. पांडू हवालदार, राम राम गंगाराम, वजीर, भस्म, कळत नकळत हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट. नंतर आलेल्याविनोदी चित्रपटांचा काळ त्यांनी अफलातून गाजवला आणि ते मराठीतले सुपरस्टार ठरले. त्याकाळची साक्ष देणारा एक हिरा म्हणजे “अशी ही बनवाबनवी”...

अशोक सराफ यांनी मराठीसोबत हिंदीमध्ये पण मोठं काम करून ठेवलंय. त्यांची ‘हम पांच’ मालिका आज क्लासिक म्हणून ओळखली जाते. याखेरीज करन अर्जुन मधला त्यांचा “ठाकूर तो गयो” हा डायलॉग आजही लक्षात आहे.

तर मंडळी, अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त पाहूया त्यांच्या गाजलेल्या १० चित्रपटांची यादी....

१. एक उनाड दिवस.

१. एक उनाड दिवस.

या चित्रपटात अशोक सराफ यांनी “विश्वास दाभोळकर” हे पात्र साकारलं होतं. विश्वास दाभोळकर म्हणजे शिस्तशीर माणूस. मुळात दाभोळकर घराण्यातच तशी शिस्त आहे. तर अशा या माणसाच्या आयुष्यातील एका उनाड दिवसाची कहाणी म्हणजे एक उनाड दिवस. अशोक सराफ यांनी शिस्तशीर विश्वास दाभोळकर आणि त्याच्यात होत जाणारे बदल चांगल्या प्रकारे टिपले होते.

२. बाळाचे बाप ब्रम्हचारी

२. बाळाचे बाप ब्रम्हचारी

मंडळी, चित्रपटातला पहिला सेल्फी घेतला गेला तो हा सिनेमा आहे.  हल्ली सोशल मिडीयावर हा फोटो चांगलाच गाजत असतो. चित्रपटातल्या एका सीनमध्ये अशोक मामा त्याकाळच्या कॅमेऱ्यात सेल्फी घेतायत असा सीन आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडगोळी एकत्र आल्यावर काय मजा येते हे या चित्रपटात दिसतं. त्या सिनेमातलं मर्फी बाळही मस्त होतं आणि कुबलकाकू नेहमीप्रमाणे रडूबाईच्या भूमिकेत होत्या.

३. गम्मत जम्मत

३. गम्मत जम्मत

कर्जाच्या बोझ्यामुळे वैतागलेला फाल्गुन गौतमसोबत पैसे मिळवण्यासाठी श्रीमंत बापाच्या पोरीला किडनॅप करतो तर ती पोरगी दोघांच्याही डोक्यावर मिरे वाटते. यातला फाल्गुन होता अशोक सराफ. या सिनेमातलं त्याचं अश्विनी ये ना हे गाणं म्हणून तुम्ही तुमच्या ओळखीच्या प्रत्येक अश्विनीला नक्कीच चिडवलंय, हो ना? गेल्यावर्षी कुणीतरी याच गाण्यावर घुमरचा व्हिडीओ केला होता. या दोघांचा नाच त्यावर पण फिट्ट बसतो.

४. चौकाट राजा

४. चौकाट राजा

या यादीत चौकट राजाचा उल्लेख करण्यामागे वेगळा उद्देश आहे. आजवर अशोक सराफ यांना आपण विनोदी भूमिकेत बघत आलोय, पण फार पूर्वीच त्यांनी चौकट राजामध्ये गणाचं पात्र साकारून त्यांच्या अभिनयाची दुसरी बाजू दाखवून दिली होती. दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला अशी पात्रं फार कमी आली.

५. बिनकामाचा नवरा.

५. बिनकामाचा नवरा.

हा चित्रपट म्हणजे त्याकाळातल्या सुपरस्टार्सची भट्टी आहे. अशोक सराफ, निळू फुले, रंजना, कुलदीप पवार, मधु कांबीकर आणि याच्या जोडीला प्रत्येकाचं विनोदाचं अचूक टायमिंग, गावरान बाज जुळून आलाय.

६. धुमधडाका

६. धुमधडाका

शशी कपूरच्या हिंदी 'प्यार किये जा'ची मराठी कॉपी असली तरी हा सिनेमा म्हणजे अस्सलाला मागे टाकेल अशी भारी कॉपी होती. 'व्याह्या विहही व्यूहया' करणारा अशोक सराफचा अशोक विसरता विसरत येत नाही.

७. माझा पती करोडपती.

७. माझा पती करोडपती.

या चित्रपटातील अशोक सराफ यांचं कॅप्टन रणगाडे हे पात्र गाजलं होतं. "सौदामिनी, कुंकू लाव" आठवतोय ना हा डायलॉग?

८. एक डाव धोबीपछाड

८. एक डाव धोबीपछाड

अशोक सराफ यांनी साकारलेला दादासाहेब दांडगे हा एकेकाळचा गुंड पण आता त्याला सुधारायचं आहे. त्यासाठी तो संस्कृत पण शिकतो. पण आपले पाप धुवून चांगल्या मार्गाला लागणं एवढं सोप्पं नसतं. अशोक सराफ यांनी ही भूमिका अफलातून वठवली होती.

९. गुपचूप गुपचूप

९. गुपचूप गुपचूप

काही सिनेमे कितीदाही पाह्यले तरी कंटाळा येत नाही, उलट पुन्हा पाहताना मजाच येते. गुपचूप गुपचूप हा असाच सिनेमा आहे. तूट श्रीराम लागू चक्क टीशर्ट पॅन्ट घालतात, हेमी आणि शामी या पोरींना गोव्याला कॉलेजात पाठवून  पद्मा चव्हाण या मुलींच्या गव्हर्नेससोबत लिव्ह इन मध्ये राहतात, आगाऊ हेमी म्हणजेच रंजना दोघी बहिणींचा डबल रोल करते, कुलदीप पवारांच्या फिरक्या घेते हे सगळं या सिनेमात असलं तरी त्यातल्या प्रोफेसर धोंडशिवाय सिनेमात मज्जा नाय हो.. च्यांक की रें म्हणणारा आणि सतत पॅन्ट वरती ओढणारा धोंड अशोक सराफांनी भारी केला होता.

१०. अशी ही बनवाबनवी.

१०. अशी ही बनवाबनवी.

विनोदी चित्रपटांच्या काळातला हा एक मानबिंदू आहे. या चित्रपटाबद्दल भरपूर बोलता येईल. आज फक्त अशोक सराफ यांच्या बाबतीत बोलू. अशोक सराफ यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग बघायचं असल्यास हा चित्रपट आदर्श ठरावा. “लिंबाचं मटण”, “सत्तर रुपये वारले”, “हा माझा बायको”, “वाट बघा, म्हणजे काय”, डोहाळे लागलेत ओ” असे कित्येक संवाद आजही मराठी पब्लिकला तोंडपाठ आहेत. हे संवाद अशोक सराफ यांच्या अचूक टायमिंग शिवाय लक्षात राहिलेच नसते.

 

तर मंडळी, कशी वाटली ही यादी ? अशोक सराफ यांचे तुम्हाला आवडलेले चित्रपट कोणते ? पटापट नावं सांगा !!

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख