पूर्वी रेसच्या घोड्यांच्या बाबतीत एक समज रूढ होता. एकाच रक्तातील दोन जोडप्यांपासून जन्मलेला घोडा ‘लंबी रेस’चा घोडा असतो. या कारणाने रक्ताच्या नात्याने जोडलेल्या जोडप्यांमध्ये प्रजनन घडवून आणलं जायचं. याला इंग्रजीत inbreeding म्हणतात. म्हणजे नात्यातल्याच मुलगा/मुलीशी संग करणे.
inbreeding हा प्रकार प्राण्यांच्या बाबतीत जसा पाहायला मिळतो तसा माणसांमध्येही आहे. आपल्या वंशात इतर वंशाची सरमिसळ होऊ नये आणि वंश ‘स्वच्छ’ राहावा म्हणून जगभरात नात्यातल्या नात्यात मुलामुलींची लग्न लावून द्यायची प्रथा आहे. ही पद्धती भारतीय पारसी समाजात मोठ्याप्रमाणात पाहायला मिळते.
प्राण्यांचं ठीक आहे ओ पण माणसांमध्ये ही प्रथा बरोबर आहे का? या प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देता येतील, पण जर विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिलं तर ती साफ चुकीची आहे. अनुवंशशास्त्राच्या अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की एकाच रक्तातील व्यक्तींच्या प्रजननातून जन्मणाऱ्या मुलांमध्ये अपंगत्व, विकृती तसेच एकूण वंशाचा जन्मदर कमी होणे, प्रजनन क्षमता कमी होणे, मृत्युदर वाढणे इत्यादी परिणाम दिसून येतात. उदाहरणासाठी भारतीय पारसी समाजाचा इतिहास पाहिला तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.













