पन्नास वर्षांपूर्वी, आर. पप्पाम्मल यांची आजी वारल्यावर त्यांच्यावर किराणा मालाचं दुकान चालवायची जबाबदारी आली, पण त्यांना शेतीची खूप आवड होती. त्यातही मुखत्वे सेंद्रिय शेतीवर त्यांचा भर होता. दुकानातील उत्पन्नातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून त्यांनी दहा एकर शेती विकत घेतली व अनेक वर्षे एकटीनं राबून ती सांभाळली. त्यात त्यांनी निरनिराळे प्रयोग केले. खत न वापरता सेंद्रिय पद्धतीने त्यांनी यशस्वी शेती केली.परंतु नंतर काही कारणासाठी ८० व्या वर्षी त्यातील काही जमीन त्यांना विकावी लागली. राहिलेल्या २.५ एकर जमिनीमध्ये त्या सेंद्रीय शेती करतात. त्यात विविध प्रकारची धान्य जशी बाजरी, डाळी, भाज्या आणि कॉर्नची लागवड करतात.
दररोज पहाटे ३ वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. पहाटे पासून दुपारपर्यंत त्या शेतीत काम करतात. आईवडील लवकर गमावल्याने त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही पण शेतीत कष्ट करण्याची अगदी लहानपणापासूनची सवय आहे. या वयातही शेतात गेल्या शिवाय त्यांचा दिवस जात नाही. त्या सर्वांना सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देतात.