हळूहळू निर्बंध कमी झाले आणि सर्वांची मुशाफिरी सुरू झाली. हवेत मस्त गारवा जाणवू लागल्याने सगळ्यांना जवळपासची ठिकाणे खुणावू लागली आहेत. गेले नऊ महिने घरात अडकलेल्या आणि कंटाळलेल्या ट्रेकर्सना आता वेध लागले आहेत नवनव्या जागांना भेटी देण्याचे. लॉंग विकेंड आला की कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन ठरत असतो. पण नक्की कुठे जायचे? हे अनेकदा ठरत नसते. म्हणूनच बोभाटाच्या वाचकांसाठी आजचा खास लेख घेऊन येत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्यांविषयी जिथे सुट्टीत एखादी भेट सहज ठरवता येईल ...
महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास लेण्यांमध्ये दडलेला आहे. पण लेणी म्हणजे नक्की काय? तर लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंध व कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघता येतात.
लेणी म्हणलं की सर्व प्रथम नाव येतं ते महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जवळच्या अजिंठा-वेरूळ येथील लेण्यांचं. अजिंठा वेरूळ येथे जगभरातून पर्यटक दरवर्षी भेट द्यायला येतात. येथील लेण्याने भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे












