काल रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या अगोदरच्या चार दिवसात कंपनीच्या शेअरचे भाव वरवर चालले होते. काल जशी वार्षिक सर्वसाधारण सभा संपत आली तसे शेअरचे भाव पडायला सुरुवात झाली. आज सकाळी हा लेख लिहित असताना कालच्या २१४८ रुपयाच्या गच्चीवरून हा शेअर बर्याच पायर्या खाली उतरला आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरचा भाव जवळजवळ ३०० रुपये वर गेला आणि काल एका दिवसात २% खाली आला.
नव्याने बाजारात आलेल्या 'बोभाटा'च्या वाचकांना असे झोके बघायची सवय नसेल तर त्यांना हे काय चाललंय हा प्रश्न नक्की पडला असेल. म्हणून या निमित्ताने भाव वरखाली जाण्याच्या कारणांची आपण थोडी चर्चा करू या. पण एक महत्वाची गोष्ट ! आजचा लेख केवळ शेअरबाजारापुरताच मर्यादीत आहे. रिलायन्स येत्या काही वर्षात काय करणार आहे हे समजण्यासाठी 'बोभाटा'चा विशेष लेख या पाठोपाठ येणारच आहे!








