भारत सरकारनं गेल्या वर्षी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणात्सव अनेक चायनिज ॲप्सवर बंदी आणली. यात देशात प्रचंड लोकप्रिय बनलेला मोबाईल गेम PUBG चाही समावेश होता. भारतात तब्बल १७ कोटींहून अधिकवेळा डाउनलोड केल्या गेलेल्या PUBG वर बंदी येण्याचं कारण होतं ते या गेमिंग ॲपच्या माध्यमातून होणारा यूजर्सच्या माहितीचा गैरवापर. भारतीय यूजर्सचा डेटा चिनी सर्व्हर्समध्ये साठवला जात असल्यामुळे देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण होत असल्याचं भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं.
PUBG या गेमचे मालकी हक्क 'Krafton Inc' या दक्षिण कोरियाई कंपनीकडे असले तरी, 'PUBG मोबाइल' हा स्मार्टफोन गेम Tensent या Krafton च्या चायनीज भागीदार कंपनीनं बनवला होता. त्यामुळे जगभरातल्या PUBG वापरकर्त्यांच्या डेटा हा Tensent च्या चिनी सर्व्हर्समध्ये साठवला जायचा. पण सुरक्षेच्या कारणामुळं भारतासोबत अन्य काही देशांनी गेमवर बंदी घातल्यानंतर क्राफ्टननं भारतात नव्या रूपात PUBG आणण्याची तयारी सुरु केली. गेम आणताना असा दावा करण्यात आला की, भारतीय यूजर्सचा डेटा भारतातच साठवला जाईल. आणि नुकतीच भारतात बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया (BGMI) या नावाने या गेमची बिटा आवृत्तीही रिलीज झाली आहे.






