आपण आजवर लातूर पॅटर्न फक्त शिक्षणक्षेत्रात पाहिला असेल. आज आम्ही खाद्यसंस्कृतीचा लातूर पॅटर्न घेऊन आलो आहोत. निलंग्याचा मसालेभात असो की बोरसुरीची बोरसुरी दाळ, किंवा उजणीची बासुंदी असो की कंदुरी मटण मसाला!! लातूरने शिक्षण क्षेत्रासोबतच खवय्येगिरीतही आपला वेगळा लातूर पॅटर्न जपला आहे. आजच्या लेखातून आपण याच खाद्यसंस्कृतीतील लातूर पॅटर्नची ओळख करून घेणार आहोत.
खाद्यसंस्कृतीतला लातूर पॅटर्न....


लातूर जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तिथल्या डाळी आणि सोयाबीन भारतात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे साहजिकच जे 'पिकतं तेच शिजतं’. ज्वारीची भाकरी किंवा चपाती तूरडाळीचे वरण, बेसन (पिठलं), भात, दही धपाटे, जवस किंवा शेंगदाण्याची चटणी असा आहार इथल्या घराघरांत दिसतो. तर सणाच्या दिवशी पुरणपोळी, झणझणीत काळ्या मिरच्याची कटाची आमटी, भात, भजी, कुरडया पापड्या असा मेनू असतो.

उजणी हे गाव 'बासुंदीचे गाव' म्हूणन प्रसिद्ध आहे. भट्टीवर बनवलेली घट्ट आणि लालसर गोड बासुंदी सर्वांना आवडते. ठाणे महोत्सवात ही बासुंदी १६ लाख लोकांनी चाखली होती. अप्रतिम चवीमुळे ही बासुंदी लंडनमध्येही मागवली गेली होती.
चाकूर तालुक्यातले आष्टामोड हे गाव चिवड्यासाठी प्रसिद्ध आहे. भाजके चूरमुरे, शेंगदाणे, तिखट, मीठ, मसाल्याचा खमंग, चटकदार चिवडा सर्वांना आवडणारा आहे. या चिवड्याचे खवय्ये चाहते सर्वत्र आहेत.

निलंगा शहरातल्या मसाले भाताची कीर्ती 'निलंगा राईस' म्हणून साऱ्या महाराष्ट्रभर पसरली आहे. श्रीमंतांना आवडणारा आणि गरिबांना परवडणारा हा निलंगा राईस घराघरात पोहचला आहे. कष्टकरी लोकांची न्याहरी या निलंगा राईसवर होते.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील डोणे बंधूचा ढवारा, कंदुरी मटण मसाला प्रसिद्ध आहे. शेतातील जेवण व पार्टीच्यावेळी या मसाल्यामुळे सहज सोप्या पद्धतीने कोणीही मांसाहारी जेवण बनवू शकतो.

निलंगा तालुक्यातल्या बोरसुरी गावातली 'बोरसुरी दाळ' प्रसिद्ध आहे. तिथल्या पाण्याला आणि डाळीला विशेष अशी चव आहे. ही मसालेदार डाळ भाकरीसोबत कुस्ककरून खाल्ली जाते.
औसा तालुक्यातल्या शिवली गावाचे 'शिवली स्पेशल मटण' प्रसिद्ध आहे. चुलीवर मातीच्या गाडग्यात बनवलेल्या या मटणावर ताव मारण्यासाठी नांदेड, सोलापूर, बीड, उस्मानाबाद भागातील लोक येतात. मटण उक्कड आणि सूपला खास पसंती आहे.

(बोरसुरी दाळ)
नसले बंधु यांची शेंगाचटणीही प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्यासाठी धपाटे, रोडगे, भज्जी, आंबील, उंडे, कोंदीची रोटी असा आगळावेगळा स्वयंपाक मेन्यू असतो.
लातूरमधील किसन हलवाई यांचे पेढे, संगमची भेळ, सुंदर वडापाव, सुखसागरची मस्तानी, ब्रिजवासी यांचे स्वीट, संजय क्वालिटीचे पोहे, नागनाथ अण्णा आणि शेळके बंधू यांची पुरीभाजी प्रसिद्ध आहे. तर चाकूर येथील ज्ञानेश्वर भोजनालय, लातूरमधील एकनाथ भोजनालय, येडेश्वरी भोजनालय, जगदंबा भोजनालय, वैष्णवी भोजनालय, श्री प्युअर व्हेज, अंबिका व्हेज ही भोजनालये प्रसिद्ध आहेत.

शहरातील इतरही बेकरी, इडली गृह,फास्ट फूड, फूड मॉल, हॉटेल असा प्रत्येक जण आपल्याला परीने ही लातूरची खाद्य संस्कृती जोपासत आहे, वाढवत आहे. शिक्षणाबरोबरच खाद्य संस्कृतीचा नवा,' लातूर पॅटर्न 'घडत आहे.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१