१८३९ साली फोटोग्राफीच्या जगताला जन्म देणाऱ्या डॅगरोटाईप पद्धतीचा जन्म झाला. कृष्णधवल रंगाची छायाचित्रे तयार होऊ लागली. तोपर्यंत चित्रकलेतूनच व्यक्ती, निसर्ग, इमारती इत्यादी गोष्टींना जपून ठेवलं जायचं. कालांतराने युरोपात ‘फोटोग्राफी’ स्थिरस्थावर झाली आणि त्यानंतर पुढची मागणी होऊ लागली. हि मागणी होती कलर फोटोग्राफची. रंगच नसल्यामुळे कितीही जिवंत चित्रे पाहायला मिळत असली तरी निराशाच होती. जेव्हा गरज असते तेव्हाच नवं काही जन्माला येतं त्याप्रमाणे एका बाजूला शास्त्रज्ञ कलर फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात सुधार करत होते, तर दुसरीकडे हाताने रंगवलेल्या फोटोंचा जन्म होत होता.
१८४० सालापासून युरोपात हाताने रंगवलेल्या फोटोंनी जोर धरायला सुरुवात झाली. साधारणपणे असे समजले जाते की, चार्ल्स विर्ग्मन आणि फोटोग्राफर फेलिस बिटो यांनी ह्या पद्धतीला जन्म दिला. पुढे काही संशोधने झाली आणि समजलं की ब्रिटीश फोटोग्राफर विल्ल्यम साउंडर्स याने पहिल्यांदा हाताने रंगवलेल्या फोटोंची कल्पना आणली होती. विल्ल्यम साउंडर्सने तयार केलेल्या १९६२ च्या जपान हेराल्ड वृत्तपत्रातल्या एका जाहिरातीवरून हे मत मांडण्यात आलं. जपान हेराल्डमध्ये ती जाहिरात देताना विल्ल्यम साउंडर्सलाही कल्पना नसेल की त्याने जी कल्पना शोधून काढली आहे ती जपानच्या संस्कृतीचा भाग बनणार आहे. पुढे जाऊन युरोपियन लोकांनी शोधलेली कल्पना जपानी नागरिकांनी उचलून धरली आणि जपानमध्ये हाताने रंगवलेल्या फोटोग्राफ्सचं नवीन पर्व सुरु झालं.















