एरवी कोर्टातील एका दिवसाची रुपये ३० लाख फी घेणारे हरीश साळवे, हेग येथे आंतराष्ट्रीय न्यायालयात "कुलभूषण जाधव" यांचा खटला फक्त १ रुपया फी घेऊन लढणार आहेत हे काल आपण सगळ्यांनी वाचले आणि ऐकले असेलच ! आपल्या वाचकांपैकी फारच थोडे कोर्टाची पायरी चढले असतील, आणि म्हणूनच आज आपण हरीश साळवे यांची ओळख करून घेऊ या !
वकीली ही साळवे कुटुंबाची परंपराच आहे. त्यांचे आजोबा ,पणजोबा हे नामांकीत वकील होते. त्यांचे वडील नंदकुमार पी साळवे चार्टर्ड अकाउंटंट होते आणि इंदिरा गांधी-राजीव गांधी-नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्री होते.
हरीश साळवे वकीली करण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. नानी पालखीवाला आणि सोली सोराबजी या कायदे पंडितांच्या हाताखाली अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे.
१९९९ ते २००२ ते भारताचे सॉलीसिटर जनरल होते. त्यानंतर कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून पुढच्या तीन वर्षांची नेमणूक त्यांनी नाकारली.
अनेक वर्षे सुप्रीम कोर्टाचे अॅमीकस क्युरी (कोर्टाचे मित्र) या पदावर काम केले आहे. (अवैध खाणकामाच्या केसमध्ये त्यांनी आधी काही खाणींच्या अशिलांसोबत काम केले असल्याने स्वतःला दूर केले होते.)
अनेक उद्योग साम्राज्याचे यशस्वी वकील म्हणूनही ते ओळखले जातात.
रिलायन्ससाठी कृष्णा गोदावरी बेसीन गॅस खटल्यात मुकेश अंबानींच्या बाजूने त्यांनी खटला सांभाळला होता. तेव्हा त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी वकील होते ज्येष्ठ कायदे पंडीत राम जेठमलानी !! या खटल्यात साळवे यांची फी होती फक्त १५ कोटी रुपये !
रतन टाटांसाठी "निरा राडीया" खटल्यात त्यांनी टाटांची बाजू मांडली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला व्होडाफोनच्या केसमध्ये त्यांना मुंबई हायकोर्टात त्यांना अपयश आले पण त्या नंतर सुप्रीम कोर्टात ते व्होडाफोन केस जिंकले. या एका खटल्यासाठी त्यांनी आपले कार्यालय काही काळ लंडन येथे हलवले होते.
सलमान खानच्या दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आणि सदोष मनुष्य वधाच्या खटल्यात त्यांनी सलमानची वकीली केली होती. या खटल्यात सलमान निर्दोष बाहेर पडला होता पण हरीश साळवे यांना काही काळ सामाजिक रोष सहन करावा लागला होता.
पण हरीश साळवे फक्त पैशासाठी काम करतात असे नाही. मानवी अधिकारच्या संरक्षणासाठी त्यांनी सुप्रसिद्ध " बिल्कीस बानो"चा खटला हाताळला होता.
काल त्यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली आहे. या खटल्यात पाकीस्तानने ज्या व्हीडीओ क्लिपचा वापर केला होता ती व्हिडीओ क्लिप न्यायालयाने पुरावा म्हणून नाकारली आहे ही जमेची बाजू आहे.
आपण सगळेच कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करू या !!




