नव्या अर्थसंकल्पाचा विचार करताना सर्व प्रथम अर्थमंत्र्यांचे काही लक्ष्यवेधी विचारांसाठी मनःपूर्वक अभिनंदन करू या! बँकेतल्या बचतीला पाच लाखांपर्यंतचे संरक्षण आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचे काही प्रमाणात खाजगीकरण हे दोन्ही मुद्दे अभिनंदनास्पद आहेत. पाच लाखाच्या संरक्षणामुळे सर्वसामान्य खातेदार कोणत्याही बँकेत पैसे जमा करताना निर्धास्त असेल. आयुर्विमा महामंडळाचे अंशतः खाजगीकरण केल्याने महामंडळ जास्त जबाबदारीने काम करेल. खाजगीकरणातून मिळणारा निधी भविष्य काळात अनेक लोकोपयोगी कामांसाठी पुरेसा असेल. पण वैयक्तिक आयकराचा विचार केला तर या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेल्या योजना स्वीकारण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकाला बराच वेगळा विचार करावा लागणार आहे.
कोणता मार्ग घ्यावा, नवा की जुना? नवा मार्ग चोखाळला तर अनेक वर्षांचे नियोजन म्हणून केलेल्या दीर्घ मुदतीच्या बचतीचे काय करायचे? जुना मार्ग आहे तो बरा म्हणावे तर आयकर जास्त भरावा लागेल त्याचे काय? एकूणात या निर्मलाबाईंनी वैयक्तिक आयकराची रचना फारच गोंधळात टाकणारी केली आहे. नेमकी कशी ते बघण्यासाठी एक गमतीचं उदाहरण बघू या!












