Emirates एअरलाईनने नुकतीच एक नवीन जाहिरात केली आहे. त्या जाहिरातीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. तुम्ही तो व्हिडीओ पाहिलात का? त्यात प्रथम असे दिसते की एक फ्लाइट अटेंडंट महिला उंच ठिकाणी, जणू आकाशात उभी आहे. परंतु नंतर जेव्हा कॅमेरा झूम होतो तेव्हा असं दिसतं की ती प्रत्यक्षात दुबईच्या बुर्ज खलिफावर उभी आहे. बुर्ज खलिफा म्हणजे जगातली सर्वात उंच इमारत! एवढ्या उंचावर उभी असलेली ही महिला कोण? आणि ती खरोखर बुर्ज खलिफावर उभी आहे का ?
३३ सेकंदांच्या छोट्या व्हिडिओमध्ये ती महिला फ्लाइट अटेंडंटच्या गणवेशात हातात काही बोर्डस घेऊन उभी आहे. त्या बोर्डवर काही वाक्यं लिहिली आहेत. एका पाठोपाठ ते बोर्डस ती दाखवते आणि जाहिरात संपते. ज्या उंचीवर ती उभी आहे ते नुसतं पाहूनच आपल्याला पोटात गोळा येईल. तिचे नाव निकोल स्मिथ-लुडविक आहे. ती प्रोफेशनल स्कायडायव्हर आहे आणि याचे शूटिंग कुठल्याही स्टुडिओत न होता प्रत्यक्षात बुर्ज खलिफावर झाले आहे.




