बुवा बाबांचे मठ, आणि या बाबांच्या सांगण्यावरुन जीवही द्यायला तयार असणारे त्यांचे अंधभक्त फक्त आपल्याच देशात पाहायला मिळतात असे नाही ,तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असे प्रकार सर्रास सुरू असतात. बलाढ्य देश आणि महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही अशा प्रकारांना अजिबात तोटा नाही.
१८ नोव्हेंबर १९७८ साली अमेरिकेच्या पीपल्स टेम्पल या चर्चच्या धर्मगुरूच्या आदेशावरून सुमारे ९०० लोकांनी सायनाइड पिऊन आत्महत्या केली होती. या चर्चचा प्रमुख धर्मगुरू जिम जोन्सने १८ नोव्हेंबरच्या सकाळी अचानकच आपल्या सर्व भक्तांना प्रार्थनेसाठी एकत्र बोलवले आणि त्यांना आपल्या आयुष्याचा शेवट जवळ असल्याचे सांगितले. चर्चच्या भवितव्यासाठी येथे जमलेल्या सर्व लोकांनी सायनाइड पिऊन स्वतःला संपवणे हे धर्मकार्य असल्याचे प्रवचन त्याने दिले आणि त्याच्या शब्दावर श्रद्धा असणाऱ्या त्याच्या सर्व भक्तांनी त्याचे अनुकरण करत सायनाइड पिले. फक्त आपण पिले असे नाही, तर स्वतः पिण्याआधी आपल्या मुलांनाही पाजले. त्या दिवशी त्या चर्चमध्ये जे कुणी उपस्थित होते त्या सर्वांचा मृत्यू झालाच पाहिजे असे कदाचित आधीच ठरले होते की काय अशीही शंका या घटनेनंतर व्यक्त करण्यात आली होती. या मागचे सत्य शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण तरीही ९०० लोकांमध्ये एकालाही या प्रकाराला विरोध करण्याचे का सुचले नाही की तसे करूच का दिले नाही हे गूढ आजही कायम आहे.







