काम करत असताना समाजाबद्दल कळकळ असेल तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे रेखा मिश्रा. त्यांच्या कामामुळे कित्येक कुटुंबाना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत झाली आहे. त्यांच्या कामाची दखल स्वतः राष्ट्रपतींनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर बेतलेला धडा महाराष्ट्रात दहावीच्या पाठ्यपुस्तकात शिकवला जातो.
रेखा मिश्रा या मूळ प्रयागराज येथील आहेत. २०१५ साली त्यांची निवड आरपीएफमध्ये झाली, तर पोस्टिंग मिळाली थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. येथे काम करत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे मुंबईच्या चंदेरी दुनियेकडे आकर्षित होऊन अनेक मुले घरातून पळून येतात. पण त्यांना इकडे वाईट आयुष्य जगावे लागते.






