आंबट गोड गोळी किंवा इंग्रजीत ज्याला कॅन्डी म्हणतात ती आपल्या प्रत्येकाच्याच बालपणाचा एक भाग आहे. ह्या रंगीत गोळ्यांचा विचार आला की लहान असो की मोठे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. ८० आणि ९० व्या दशकात ज्यांनी बालपण अनुभवले त्यांना तर लाल हिरव्या रंगाच्या चकचकीत कागदातील लाल रंगाचे पान पसंद नक्कीच आठवत असेल. त्यावेळी चॉकलेट, गोळ्या, या सगळ्या गोष्टींचे कौतुकच वेगळे होते. आज पाच रुपयापासून पाचशे रुपयापर्यंतचे वेगवेगळ्या ब्राँडच्या कॅन्डीज बाजारात उपलब्ध आहेत, पण तेव्हा मिळणाऱ्या या रुपयाच्या गोळीची मजाच वेगळी होती.
मुळात त्याचा तो लाल आणि हिरव्या रंगाचा चकचकीत कागद आणि ती गोळी खाल्ल्यावर जिभेला येणारी पान खाल्ल्याची चव आणि रंगत यांची पण गंमत वेगळी होती. पान लहान मुलांनी खायचं नसतं म्हणून पालक पान खायला मनाई करत असत तेंव्हा मुलांना ही गोळी खाऊनच समाधान मानावं लागे. असे ते दिवस. भारतातील पहिली-वहिली मेड इन इंडिया कॅन्डी म्हणजे पान पसंद.










