एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ!!

लिस्टिकल
 एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ!!

खुलभर दूधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो . गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य!! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्या आज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत!
 

(तोन्से माधव अनंत पै )

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला.  खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. 

अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत.  मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्याची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे!

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावतल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- 'पिग्मी डिपॉझीट स्कीम'. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय! 

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  "पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून?". यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. "घरी गाय पाळा". हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. "एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार?" डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, "मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या".  पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली.  "बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल".
 
लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली.  त्यानंतर 'मी पण - मी पण ' असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूधसंस्था उभी राहीली.

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं-  कॅनरा इंडस्ट्रीअलअँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड. १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात ऊडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातल्या आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.

डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे. 

महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले.  पण दूधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख