'पिंजरा' सिनेमा आठवतोय? मास्तरांचा गावभरात आदरयुक्त दरारा होता. असं एकेकाळी घडत असे बरं.. गावातल्या कुठल्याही निर्णयात गावातल्या शिक्षकाला सामील करून घेतले जात असे. त्याला एवढा सन्मान मिळायचा कारण निस्वार्थ वृत्तीने ते आपली सेवा बजावत असत. शिकवणं सोडून ते आता ज्याला आपण लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणतो ते करत असत. पण काळ बदलला तसा शिक्षकी पेशासुद्धा व्यावसायिक होऊन बसला. मग आपलं नेमून दिलेलं काम करणं एवढ्यापुरतं अर्थ या महत्वाच्या पेशाला उरलं. अर्थात यात काही गैर आहे असं नाही. पण या कारणामुळे म्हणावा तसा आदर शिक्षकी पेशाला आता मिळत नाही.
शिक्षक हा समाजाला दिशा देणारा असावा लागतो. त्याच्या जगण्यातून तो समाजाला वाट दाखवत असतो. असे शिक्षक आज दुर्मिळ झाले आहेत. पण असे असले तरी आजही शिक्षणाचे व्रत घेऊन काम करणारे शिक्षक आहेत राव!! आणि त्यांच्यामुळेच आजही खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाची गंगा अव्याहत सुरू आहे. असेच एक शिक्षक म्हणजे नंदुरबारचे नरेंद्र पाटील सर!!!







