कोरोनाव्हायरसचे थैमान घातल्यापासून मोठ्यांना हात धुण्याचं महत्त्व जास्त ठळकपणे समजलेलं आहे. पण छोट्यांना हात धुण्याचं महत्त्व शिकवणं तसं अजूनही कठीणच आहे. म्हणून मायामीच्या शाळेतील शिक्षिकेने एक आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. तुम्ही नसेल पाहिला तर लगेच पाहून घ्या.
लहान मुलांना जंतू, विषाणू यांच्याबद्दल सांगितल्यास ते त्यांना कितपत समजेल हा प्रश्नच आहे. म्हणून मायामीच्या अमांडा लॉरेन्झो या शिक्षिकेने शोधून काढलेली ही आयडियाची कल्पना जास्त सोप्पी वाटते. तिने काय केलं ते समजून घेऊया.
व्हिडीओच्या सुरुवातीला दिसणारी घाणेरडी बशी ही घाणेरडी नसून त्यात काळी मिरी आहे. तिने आधी मुलाला घाणेरड्या बशीत बोट बुडवायला सांगितलं. त्यानंतर तेच बोट साबण असलेल्या बशीत बुडवायला सांगितलं. त्यानंतर ते बोट पुन्हा घाणेरड्या बशीत बुडवायला सांगितलं. आता रासायनिक क्रियेने साबणामुळे काळी मिरी मागे सरली.





