कोरोनाने संपूर्ण मानवजातीला जेरीस आणले आहे. लॉकडाऊनच्या काळात किमान पर्यावरणाची तरी झालेली झीज भरून निघत असल्याबद्दल थोडा फार दिलासा वाटत होता. पण, या नव्या वर्षात एक नवीच आपत्ती उभी ठाकली आहे. गेल्या आठवडा भरात भारतातील स्थलांतरित पक्षी अचानक मरून पडत आहेत. हिमाचल प्रदेश मध्ये तर गेल्या चार दिवसांत १७७३ स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत आढळले. हिमाचल प्रदेशमधील कांगरा जिल्ह्यातील पोंग धरण परिसरात हे पक्षी मृतावस्थेत आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पक्षी मृतावस्थेत आढळल्याने वनअधिकाऱ्यांनाही मोठाच धक्का बसला आहे. या मृत पक्षांच्या मृत्युमागाचे नेमके कारण शोधण्यासाठी या पक्षांचे नमुने गोळा करून त्याची पडताळणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
२९ डिसेंबर रोजी मझार, बाथरी, सिहाल, जग्नोली, छट्टा, धामेटा आणि कुथेरा या परिसरात जवळपास ४२१ मृतपक्षी आढळले. यानंतर या मृतपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कांगरा जिल्ह्याच्या उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार प्रजापती यांनी या परिसरात अलर्ट घोषित केला आहे. प्राण्यांच्या वावरावरही बंधने आणली आहेत.







