प्यूर्टो रिकनमधल्या पाळीव प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लगली होती. हळूहळू मेक्सिको, चिले, अर्जेंटिना, कोलंबिया, अमेरिका या आणि इतर देशांतील लोकही याच प्रकारे त्यांचे पाळीव प्राणीही संपत असल्याची तक्रार करू लागले. पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याची कुणालाच कसलीही कल्पना नव्हती. म्हणूनच प्रत्येकाला या एलियनसारख्या दिसणाऱ्या छुपाकॅब्रावरच दाट संशय होता. हा छुपाकॅब्रा कसा दिसतो, तो कुठून आला, याबद्दल प्रत्येकांनी स्वतःची एक वेगळी थेरी मांडली होती. या प्राण्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य गोष्टी गुंफण्यात आल्या होत्या. काही लोकांनी तर हा प्राणी आपण प्रत्यक्षात पाहिला असल्याचाही दावा केला होता.
इतक्या देशांत याचा प्रसार झाल्यानंतर बेंजामिन रॅडफोर्ड यांच्या नेतृत्वाखाली छुपाकॅब्रामागचे गौडबंगाल नेमके काय आहे, खरंच असा कुठला प्राणी अस्तित्वात आहे का, वगैरे प्रश्नांची उत्तरे शोधून एकदाचा त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. या सगळ्या प्रयासात बेंजामिन यांना दक्षिण अमेरिकेतील एकूणएक जंगले पालथी घालावी लागली. इतकी भटकंती केल्यानंतर त्यांची प्रत्यक्षात छुपाकॅब्रा पाहिलेल्या एका माणसाची भेट झाली. तिचे नाव होते मेडलीन टोलेंटीनो. तिचे म्हणणे होते की तिच्या घराच्या खिडकीतून तिने हा प्राणी पहिला होता. दोन पायांवर चालणाऱ्या या प्राण्याचे डोळे काळे होते, त्याची त्वचा काटेरी होते. पाठीवर सरळ रेषेत मोठमोठे काटे होते. हाच प्राणी पाळीव प्राण्यांचे रक्त शोषून घेतो आणि त्यांना मारून टाकतो याबद्दलही तिला खात्री होती. हा प्राणी कांगारू प्रमाणे उड्या मारत पळतो अशीही माहिती तिने दिली.
त्यानंतर बेंजामिननी हा प्राणी पाहणाऱ्या इतरही काही लोकांची भेट घेतली. काही लोकांनी छुपाकॅब्राचे केलेले वर्णन हे मेडलीनच्या वर्णनाशी जुळणारे होते, तर काहींचे अगदी वेगळे होते. काहींच्या मते हा प्राणी दोन पायांवर चालत नसून तो चार पायांचा आहे.