कोरोनामुळं अवघ्या जगाचं चक्र थांबलंय. याला किक्रेट सामने तरी कसे अपवाद ठरतील! अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांसोबतच जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेली, महागडी 'आयपीएल' स्पर्धाही यावर्षी आयोजकांना रद्द करावी लागली आहे. पण हळूहळू आता परदेशात क्रिकेट सामने खेळवले जाताहेत. सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड-वेस्ट इंडिज या दोन संघांदरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. दुसरीकडे परवा दक्षिण आफ्रिकेत एक वेगळाच क्रिकेट सामना खेळला गेला. खरंतर याला क्रिकेटचा एक नवा फॉरमॅट म्हणायला हरकत नाही. नाव आहे 3T क्रिकेट!!
हे 3T क्रिकेट काय आहे भाऊ? यात तर चक्क तीन संघ एकाच मॅचमध्ये खेळताहेत!!


कोव्हीड-१९ बाधितांसाठी निधी गोळा करण्याच्या हेतूनं 'South Africa's Solidarity Cup' या नावानं हा सामना खेळवला गेला. पण हा सामना नेहमीसारखा नव्हता. इथं एकाच मॅचमध्ये तीन टिम्स एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. यात दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळांडूंचा सहभाग होता. क्रिकेटचा हा नवा प्रकार जगभरातल्या क्रिकेटप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय बनलाय तो त्याच्या वेगळ्या नियमांमुळं. त्यामुळं आपण आज इथं या 3T प्रकाराचे नियम समजावून घेऊया.

नेहमीच्या क्रिकेट संघात ११ खेळाडू असतात. पण 3T क्रिकेटमध्ये प्रत्येक संघातून ८ खेळाडू खेळतील. तीन टिम्ससाठी एकूण ३६ ओव्हर्सची ही मॅच असेल आणि प्रत्येक संघाला १२ ओव्हर्स फलंदाजी करायची आहे. बाकीच्या दोन संघाना प्रत्येकी ६ ओव्हर्स गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे ७ गडी बाद झाल्यानंतर ८वा नाबाद खेळाडूही इथं एकटा बॅटिंग करू शकतो. पण त्याला फक्त २, ४, ६ अशा सम संख्येत धावा बनवाव्या लागतील! आणि जर पहिल्या सहा षटकांमध्येच संघाचे ७ गडी बाद झाले, तर मात्र नाबाद खेळाडूला फलदांजी करता येणार नाही.

गोलंदाजीच्या ६ घटकांमध्ये एका टीमचा एक बॉलर जास्तीत जास्त ३ ओव्हर्स गोलंदाजी करू शकतो. गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही टीम्सना त्यांच्या बाराही षटकांचा कोटा एकाच बॉलने पूर्ण करायचा आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि डगआऊट, असा सामन्याचा क्रम असणार आहे. म्हणजे फलंदाजी केलेल्या टीमला लगेच ६ षटकं गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर तो संघ पॅव्हेलियनमध्ये जाईल. प्रथम फलंदाजी कोणत्या टीमने करायची याचा निर्णय ड्रॉ पध्दतीनं केला जाईल.

सामन्यात पावसानं व्यत्यय आणल्यास खेळांची षटकं ३०, २४, किंवा १८ अशी कमी करता येऊ शकतात. या सामन्यात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला 'गोल्ड पोझिशन' मिळेल. दुसऱ्याला 'सिल्व्हर' आणि तिसऱ्या संघाला 'ब्रॉन्झ पोझिशन' दिली जाईल. दोन संघांची धावसंख्या समान झाल्यास सुपर-ओव्हर खेळवली जाईल. तीनही संघांची धावसंख्या समान झाली तर मात्र तीनही संघांना गोल्ड पोझिशन मिळेल.

शनिवारी दक्षिण आफ्रिकेत झालेला 3T सामना हा इगल्स, किंगफिशर्स आणि काईट्स या तीन संघांमध्ये होता. काईट्सचा कप्तान होता क्विंटन डि-कॉक, किंगफिशर्सचा कप्तान होता रिझा हेन्ड्रीक्स, तर इगल्सचं कप्तानपद होतं. ए बी डिव्हीलियर्सकडे. या सामन्यात इगल्स संघानं ४ बाद १६० धावा करत गोल्ड पोझिशन मिळवली. काईट्स संघानं ३ बाद १३८ धावा करत सिल्व्हर, तर किंगफिशर्सनी ५ बाद ११३ धावा करत ब्रॉन्झ स्थान मिळवलं.
क्रिकेटचा हा नवा प्रकार तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला आवडेल का? कमेन्ट करून कळवा...
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१